Join us

बंबार्डियर ‘ओके’ तरीही...

By admin | Published: April 24, 2015 3:22 AM

पश्चिम रेल्वे मार्गावर नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बंबार्डियर लोकलचे सर्वेक्षण एमआरव्हीसीकडून करण्यात येत असतानाच एम-इंडिकेटरकडूनही

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर नव्याने ताफ्यात दाखल झालेल्या बंबार्डियर लोकलचे सर्वेक्षण एमआरव्हीसीकडून करण्यात येत असतानाच एम-इंडिकेटरकडूनही स्वतंत्ररीत्या सर्वेक्षण करण्यात आले. एम-इंडिकेटरच्या सर्वेक्षणात प्रवाशांनी प्रश्नांची उत्तरे देतानाच सूचनांचा भडिमारही केला आहे. यात बंबार्डियरला प्रवाशांनी ‘ओके’ असल्याचे ‘सर्टिफिकेट’ जरी दिले असले तरी दरवाजाजवळील अडचणीचा खांब काढून टाकण्यात यावा आणि आसनव्यवस्था सुधारण्यात यावी अशी स्वतंत्ररीत्या सूचनाही केली आहे. एमआरव्हीसीमार्फत एमयूटीपी-२ अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर १५ मार्चपासून दाखल झालेल्या दोन बंबार्डियर लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी १८ मार्चपासून एमआरव्हीसीने आपल्या वेबसाइटवर सर्वेक्षण सुरू केले. मात्र प्रवाशांकडून वेबसाइटवर प्रतिसाद कमी मिळत असल्याने प्रत्यक्षात थेट बंबार्डियर लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनच प्रतिक्रिया घेण्याचा निर्णय घेतला. आठवडाभर चाललेल्या या सर्वेक्षणात तीन हजार प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. या सर्वेक्षणावर अजून काम सुरू असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी एम-इंडिकेटरवरूनही सर्वेक्षण करण्याचा निर्णय एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची कल्पना न दिल्याने एम-इंडिकेटरवरून करण्यात येणारे सर्वेक्षण रद्दच करण्याचा निर्णय एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे बंबार्डियरचे स्वतंत्ररीत्या सर्वेक्षण करण्याचा निर्णय एम-इंडिकेटरने घेतला आणि मागील एक आठवडा सर्वेक्षणही केले. यात १ लाख २६ हजार जणांनी आपली मते एम-इंडिकेटरवर नोंदवली. यातील २२ हजार ७६६ जणांनी बंबार्डियर लोकल माहिती असल्याचे सांगत आपले मत नोंदविले तर उर्वरित प्रवाशांनी बंबार्डियर लोकल माहितीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे ज्यांना बंबार्डियर लोकल माहीत आहे, त्यांचे मतच एम-इंडिकेटरकडून ग्राह्य धरण्यात आले. यामध्ये प्रवाशांनी बंबार्डियर ‘ओके’ असल्याचे सांगितले आहे. यामध्ये दरवाजात चढताना आणि उतरताना असलेला खांब समाधानकारक असल्याचे मत १५ हजार २३ प्रवाशांनी नोंदविले आहे. तर ७ हजार ७४३ जणांनी तो खांब असमाधानकारक असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर तर २१ हजार ३५ प्रवाशांनी आसन व्यवस्था समाधानकारक असल्याचेही सांगितले आहे. मात्र हे सांगतानाच प्रवाशांनी आसनव्यवस्थेत बदल केला जावा, असे सांगितले आहे.