शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अलीकडेच नियुक्त केलेल्या नेत्यांच्या सत्काराचा कार्यक्रम विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्या रांगेत हजर होते. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे मंत्री व गायक बाबूल सुप्रियो यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तीन दशके मुंबईत काढलेले बाबूल मुंबईचा उल्लेख सतत बॉम्बे, बॉम्बे करीत होते. अनेकांना ते खटकत होते. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या एक चित्रपटात सर्व पात्रे बॉम्बे, बॉम्बे करत होती तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोहरला घरी बोलावून दम दिल्यानंतर चित्रपटातील ‘बॉम्बे’ हा उल्लेख म्युट केला गेला. उद्धव यांनी बाबूलला ना म्युट केले ना भाषणात कानपिचक्या दिल्या.
राजकीय वड्याची खमंग चर्चा
वडापाव महोत्सवाचे उद्घाटन करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला- खास करून एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना त्याच वडापावची उपमा दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वडा अजित पवार आहेत, की अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यातील वडा एकनाथ शिंदे आहेत, की आणखी तिसरा पर्याय... असे विचारत खुमासदार शैलीत त्यांनी राज्य सरकारला चिमटे काढले. मराठी पाट्या आणि टोलनाके या विषयांवर दोन तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी महोत्सवात वडापावचा आस्वाद घेतला आणि खमंग राजकीय चर्चाही घडवून आणली. पण यातला कोणता आपल्याला वडा आवडतो, याबद्दल ताकास तूर लागू दिला नाही.