डिपॉझिट गेले तरी बेहत्तर, उमेदवारांचा लढण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:22 AM2019-04-24T01:22:52+5:302019-04-24T01:23:18+5:30
उत्तर मध्य मुंबईत अपक्ष उमेदवाराचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला
मुंबई : उत्तर मध्य मतदारसंघात खरी लढत ही भाजपच्या पूनम महाजन व काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यामध्ये होत असली, तरी या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. महाजन व दत्त यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अब्दुल रहमान अंजारीया यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.
छोट्या-मोठ्या पक्षांसोबत मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, अनेकदा या उमेदवारांना मिळणारी मते एकूण मतदानाच्या अत्यल्प असल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होते. तरीदेखील प्रत्येक निवडणुकीत नव्या उमेदीने अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असतात.
अनेकदा राजकीय पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळाली नसलेल्या व्यक्ती अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतात. त्यांच्यापैकी काही जणांची राजकीय ताकद चांगली असल्यास त्यांचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता असते. मात्र, अनेकदा केवळ निवडणूक लढविण्याच्या हौसेखातर असे उमेदवार रिंगणात असतात. मात्र, डिपॉझिट वाचविण्यासाठी आवश्यक असलेली मते मिळविण्यात अपयश आल्याने त्यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुश्की ओढावते.
डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.