परीक्षा रद्द झाल्या तरी चाचण्यांसाठी पुन्हा अभ्यास करावा लागलाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:19+5:302021-07-09T04:06:19+5:30
अंतर्गत गुणदानासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन चाचण्या लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारावीचा यंदाचा निकाल हा राज्य शिक्षण मंडळाने ठरवून ...
अंतर्गत गुणदानासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन चाचण्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीचा यंदाचा निकाल हा राज्य शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या ३०:३०:४० या सूत्रानुसार अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असून, गुणदानाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला शिक्षक आणि महाविद्यालयांकडून सुरुवातही झाली आहे, तर बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द होऊनही पुन्हा अभ्यासाला बसावे लागत आहे. ज्या महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी यंदाच्या वर्षाचे काहीच गुण संकलित नाहीत, अशा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या २०-२० गुणांच्या चाचण्यांचा गुगल फॉर्म/ ऑनलाइनच्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ऑनलाइन चाचणी परीक्षांसाठी का होईना विद्यार्थ्यांना पुन्हा बारावीचा अभ्यास करावा लागत असून शिक्षक, प्राचार्यांचीही यात धावपळ होत आहे.
बारावीच्या परीक्षा रद्दच निर्णय जाहीर झाल्यानंतर परीक्षा होणार नाहीत, अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर गुणदान केले जाणार या विचारात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी साहजिकच अभ्यासापासून अंतर ठेवले. मात्र, मूल्यमापन पद्धतीच्या कार्यवाहीप्रमाणे बारावी अंतर्गत मूल्यमापन करताना ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी तोंडी/ प्रात्यक्षिक/अंतर्गत/तत्सम परीक्षा आयोजित केल्या नसतील, त्यांनी ऑनलाइन किंवा अन्य शक्य त्या पर्यायी मूल्यमान पद्धतींनी त्या आयोजित करून गुणदान करावे, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. बारावीच्या निकालात ३०:३०:४० सूत्रातील ४० टक्के गुणांचा समावेश असल्याने बारावीच्या अंतर्गत गुणांचे महत्त्व जास्त आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांकडून बारावी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या ऑनलाईन आयोजित करण्यात आल्या आहेत. बहुतांश महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना चाचण्यांचे वेळापत्रकही दिले असून, अभ्यासासाठी काही कालावधीही देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळले आहेत.
निकालासाठी वेळ कमी असल्याने तक्रारींचा पाढा न वाचता विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करून चाचण्या द्याव्या, असे मत मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी दिली.
..........................
परीक्षा रद्द झाल्या म्हणून इतके दिवस अभ्यास केला नाही; पण आता चाचण्यांसाठी तो पुन्हा करावा लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांसाठी हे गुण महत्त्वाचे आहेत. मात्र, या नियोजनाची माहिती आधीपासूनच असती तर आम्हाला तयारीला अधिक वेळ मिळाला असता.
प्रेरणा कळंबे, विद्यार्थिनी, वाणिज्य शाखा