Join us

'याला धमकी समजली तरी चालेल', 'तान्हाजी' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:31 PM

'तान्हाजी' सिनेमाच्या ट्रेलरबाबतसंभाजी ब्रिगेड संघटनेने आक्षेप घेतला आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान, काजोल यांचा आगामी सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर 3 मिनिटे 21 सेकंदांचा असून यामधील संवाद, कलाकारांचा अभिनय, भव्यदिव्य सेट, युद्धाचे प्रसंग लक्ष वेधून घेतात. तसेच, हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. मात्र, या चित्रपटातील काही दृश्यावरुन दिग्दर्शक ओम राऊत यांना जितेंद्र आव्हाडांनी इशाराच दिलाय.  

'तान्हाजी' सिनेमाच्या ट्रेलरबाबतसंभाजी ब्रिगेड संघटनेने आक्षेप घेतला आहे. हा सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ओम राऊत यांना इशारावजा धमकी दिलीय.  ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी साधू लाकूड फेकून मारत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले आहे. असा चुकीचा इतिहास जनतेसमोर जावू नये. ट्रेलरमधून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक टीआरपी वाढविण्यासाठी असे कृत्य करण्यात आले आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही चित्रपटातील दृश्यांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी दिसून येत आहेत. अनैतिहासिक घटना घुसडल्या आहेत, त्यात लवकरात लवकर बदल करा, असे म्हणत आव्हाड यांनी इशारा दिलाय. माझ्या इशाऱ्याला धमकी समजली तरी चालेल, असेही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.  

दरम्यान, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडछत्रपती शिवाजी महाराजट्विटरराष्ट्रवादी काँग्रेसबॉलिवूड