Join us

पावसाळा तोंडावर आला, तरी अजूनही वृक्ष छाटणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 2:18 AM

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले.

मुंबई : मुंबई महापालिकेकडून पावसाळापूर्व धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरी वृक्ष छाटणी सुरूच असून, जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. पालिकेच्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत, तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत.

या व्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून, उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत. यामध्ये पालिकेची जबाबदारी असलेली झाडांची पालिकेने तर खासगी जागेवरील झाडांची छाटणी त्यांनी करणे अनिवार्य होते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरीही झाडांची छाटणी सुरूच आहे. पावसाळ्यात झाडे पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

झाडे छाटणी योग्य रीतीने होत नाहीझाडे छाटणी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते, परंतु रस्ते, नालेसफाईचे काम दिलेल्यानाच हे काम दिले जाते. त्यांना झाडे छाटणीची योग्य पद्धत माहिती नसते. ते झाडे छाटणी योग्य रीतीने करत नाहीत, त्यामुळे अपघात घडतात. -रवी राजा, विरोधी पक्षनेता

सध्या वृक्ष छाटणी सुरू आहे. आचारसंहितेमुळे रस्ते कामातील प्रस्ताव प्रस्ताव मंजूर झाला नव्हता. तो आज मंजूर करण्यात आला. नाले, विकासकामे, मेट्रो आदी कामांसाठी वृक्ष तोडण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे वृक्ष तोडणीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. - अभिजित सामंत, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य