Join us

मान्सून कोसो दूर तरीही मुंबई भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रासह पश्चिम बंगालच्या उपसागरात उठलेल्या चक्रीवादळांसह उर्वरित अनेक घटकांमुळे ३१ मे रोजी केरळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रासह पश्चिम बंगालच्या उपसागरात उठलेल्या चक्रीवादळांसह उर्वरित अनेक घटकांमुळे ३१ मे रोजी केरळात दाखल होणाऱ्या मान्सूनला लेटमार्क लागला. आता हा मान्सून ३ जून रोजी केरळात दाखल होणार आहे. म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रापासून ताे आजघडीला कोसो दूर आहे. तरीही सोमवारी सकाळी मुंबईच्या उपनगरात तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी हजेरी लावली आणि मुंबई भिजली.

तौक्ते वादळामुळे मुंबईसह लगतच्या जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. त्यानंतर, मात्र पाऊस विश्रांतीवर गेला. अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे मात्र मुंबईकरांना उकाडा नकोसा झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाचे ढग दाटून येत असले, तरी पावसाचा काही पत्ता नव्हता. मात्र, सोमवारी पहाटेपासूनच मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले. विशेषत: पश्चिम आणि पूर्व उपनगरात सकाळी सकाळीच दाटून आलेल्या ढगांनी काळोख केला. त्यानंतर, अकरा वाजल्यापासून पावसाने अर्ध्या तासांपेक्षा अधिक काळ बरसत कुर्ला, साकिनाका, अंधेरी, आरे कॉलनी, पवई, सांताक्रुझ, मालाडसह बहुतांश परिसरात पावसाने हजेरी लावली.

* चार दिवस लावणार हजेरी!

अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले. विशेषत: दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. दुपारी बारानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. दुपारसह सायंकाळी पाऊस घेऊन आलेल्या ढगांनी प्रचंड काळोख केला होता. मान्सून मुंबईत येण्यास ११ ते १४ जून उजाडणार असला, तरी पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत पावसाच्या अशाच अवेळी सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

...................................