पावसाळा संपला, तरी राज्यात साथीच्या आजारांचा आलेख वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:41 AM2019-11-15T05:41:53+5:302019-11-15T05:41:57+5:30
पावसाळा संपला तरी राज्यात साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही.
मुंबई : पावसाळा संपला तरी राज्यात साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. एकीकडे बदलत्या वातावरणामुळे जंतूसंसर्गाचा धोका वाढत आहे तर दुसरीकडे जीवनशैली आणि आहाराने सामान्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. त्यामुळे राज्यात डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढत असून वेळीच खबरदारी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे तज्ज्ञांनी सुचविले आहे. राज्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत मलेरियाच्या १० हजार ७२६ रुग्णांची तर, डेंग्यूच्या नऊ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्याच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, पुण्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षांच्या सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांतील रुग्णांपेक्षा आता या आजारांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यात २ हजार ४७ डेंग्यू रुग्ण आढळले होते, तर यंदा २ हजार ७५५ रुग्णांची नोंद करण्यात आली.
त्याचप्रमाणे आॅक्टोबरमध्ये गेल्या वर्षी २ हजार १८३ डेंग्यूचे रुग्ण आढळले असून या वर्षी २ हजार २७८ रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. पुण्यात डेंग्यूचे सर्वाधिक म्हणजे १ हजार ९६१ रुग्ण असून कोल्हापूरमध्ये १ हजार २८१ तर नाशिक, सांगलीमध्ये अनुक्रमे ६८२, ४८० रुग्ण आढळून आले.
यंदाच्या वर्षभरात मलेरियाचे राज्यात १० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मलेरियामुळे १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबई शहर उपनगरात आॅक्टोबरच्या पंधरवड्यात डेंग्यूचे १०९ तर, मलेरियाच्या २४० रुग्णांची नोंद झाली. तसेच या कालावधीतील १ हजार ९७० डेंग्यूसदृश्य रुग्णांवरही उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली होती.
>पौष्टिक आहार गरजेचा
फिजिशिअन डॉ. राजेश स्वामी यांनी सांगितले की, बदलत्या वातावरणाचा धोका टाळण्यासाठी सामान्यांनी पौष्टिक आहार घ्यायला हवा. जेणेकरून, चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आजारांना प्रतिबंध करता येईल. बदलत्या ऋतुमानानुसार जीवनशैलीत बदल करायला हवेत. त्याचप्रमाणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती या घटकांची विशेष काळजी घेतली पाहिजे.