Join us  

साठा ८५ टक्के झाला तरीही मुंबईकरांवर टंचाईचे टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 2:08 PM

ऑक्टोबरमधील जलसाठ्यावर नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रातही पाऊस पडला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो झालेला नाही. शिवाय जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबरमधील जलसाठ्यावर नियोजन

दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक मानण्यात येते. यावर्षी ऑक्टोबरमध्ये जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते, अशी माहिती दिली.

  • यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरुवातीला अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. 
  • ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत मुंबई पालिकेतर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलैपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. 
  • ९ ऑगस्टला पाणीसाठा ८१ टक्के असल्याने ही कपात मागे घेतली. 
  • पाणी कपात मागे घेतल्यानंतरही मुंबईत पाऊस पडलेला नाही.
  • गेल्या १५ दिवसांत तर तलावातील जलसाठ्यात अवघ्या ५ टक्क्यांनीच वाढ झाली आहे. यामुळे पाणी टंचाईची चिंता अद्याप दूर झालेली नाही.

मुंबईकरांवर पाण्याचे टेन्शन अजून काही दिवस कायम राहणार असून पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आहे.

  • सर्व तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून या तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.
  • सध्या या तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका साठा आहे.
टॅग्स :मुंबई