मुंबई :
प्रवाशांच्या गर्दीचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ला रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हाती घेतलेले काम केवळ ४० टक्केच झाले आहे. अडीच महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनपूर्वी उर्वरित कामे पूर्ण झाली नाहीत, तर रेल्वे प्रवाशांच्या मनःस्तापात यामुळे आणखीच भर पडणार आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कुर्ला रेल्वे स्थानकाच्या सुधारणा प्रकल्पास विलंब होत आहे. या कामासाठी निश्चित करण्यात आलेली ३० नोव्हेंबर २०२४ची डेडलाइन यापूर्वीच चुकल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रातून समोर आली आहे. ७ डिसेंबर २०२३पासून मेसर्स टेक्नोक्राट असोसिएट्स कंपनीकडून हे काम सुरू असून, यातील ६० टक्के काम अजूनही शिल्लक आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १०.९४ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गती शक्ती युनिटतर्फे पायाभूत सुविधा, सुधारणा आणि सौंदर्याकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत होणार कोणती कामे ?
वाहतूक व्यवस्थेची सुधारणा, परिसर सौंदर्गीकरण, प्रवेशद्वारांचा विकास व सुशोभीकरण, उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मवर छप्पर, स्थानकाची उंची व संरचनेत सुधारणा, स्टेशन अंतर्गत सजावट, प्रतीक्षा कक्ष, शौचालयांचे आधुनिकीकरण, फर्निचरची उपलब्धता, १२ मीटर रुंद मध्यवर्ती पादचारी पुलाची (फूट ओव्हर ब्रिज) उभारणी, रॅम्पची सुविधा.