पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आझाद मैदानावर स्टेज उभारण्याची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:41 PM2024-01-25T17:41:29+5:302024-01-25T17:42:47+5:30
Right to Protest या अधिकाराखाली आम्हाला हे मैदान मिळाले आहे. मनोज जरांगेशी संपर्क साधून आम्ही स्टेजचे काम करत आहोत असं विरेंद्र पवार यांनी सांगितले.
मुंबई - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनाच्या अंतरवाली सराटी येथून काढलेला मोर्चा आता काही तासांत मुंबईत पोहचणार आहे. परंतु मुंबईच्या आझाद मैदानावर पोलिसांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. मात्र मराठा समन्वयकांनी आझाद मैदानात स्टेज उभारण्यासाठी नारळ फोडत तयारीला सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत पोहचतील त्यानंतर सकाळी ध्वजारोहण करून मराठा आंदोलनाला सुरुवात होईल. याठिकाणी मंच उभारला जात आहे. आम्ही अर्ज आधीच दिले होते अशी माहिती मराठा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली.
विरेंद्र पवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाची आधीच माहिती दिली होती. वेळोवेळी पत्रक काढले, अर्ज दिले तरीही सरकारला आंदोलनाची माहिती नव्हती का?. Right to Protest या अधिकाराखाली आम्हाला हे मैदान मिळाले आहे. मनोज जरांगेशी संपर्क साधून आम्ही स्टेजचे काम करत आहोत. कोर्टाने आम्हाला ही परवानगी दिली आहे. पोलिसांनी कुठलीही नोटीस पाठवली त्याचे उत्तर आम्ही देऊ. कायदेतज्ज्ञ उत्तर देतील. २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन सुरू होणार असं त्यांनी ठामपणे सांगितले.
तर आम्हाला मुंबईतले मार्ग माहिती नाही. पोलिसांनी आम्हाला मार्ग बदलण्याचा सल्ला दिला आहे. आम्हाला रस्ते माहिती नाही. आज रात्री वाशीत मुक्काम करणार आहोत. स्थानिक पदाधिकारी आणि पोलीस एकमेकांशी बोलतील. आम्हाला कुठेही जायला सांगितले तरी त्या मार्गाने जाऊ. प्रजासत्ताक दिन आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे. मला रस्ते माहिती नाही मग मी काय करू? कोर्टाच्या नावाखाली एक कागद आणला त्यावर मी सही केली. मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाचा संबंध जोडू नका. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन साजरा करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मी २६ जानेवारीला आझाद मैदानात जाणार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती केली. आरक्षणाच्या विषयावर आता तुम्हीच तोडगा काढा असं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.