Join us

भरती नसतानाही मिठी नदीला पूर, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

आशिष शेलार : मुख्यमंत्र्यांनी वेळीच तज्ज्ञांची बैठक बोलवावीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. ...

आशिष शेलार : मुख्यमंत्र्यांनी वेळीच तज्ज्ञांची बैठक बोलवावी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असूनही मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. २५ वर्षांत असे कधीच घडले नाही. त्यामुळे या घटना मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर तातडीने विचार करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह तज्ज्ञांची बैठक बोलवावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत, त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असा आरोपही शेलार यांनी केला. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेल्याचा आरोप करून शेलार म्हणाले की, पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नसून हातसफाई आहे. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भागाचे महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवे होते. पण पालिकेने हे सर्वेक्षण केले नाही. पालिका नागरिकांचे ऐकत नाही. नगरसेवकांचे ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचे आहे काय, अशी टीकाही शेलारांनी केली आहे.

पालिकेची फ्लड वॉर्निंग सिस्टिम केवळ कलानगरसाठीच आहे. कलानगरला फ्लड वॉर्निंग आणि बाहेर फ्लड बेरिंग, अशी स्थिती आहे. मिठी नदीवर १८६ ठिकाणी फ्लड गेट लावण्यात येणार आहेत. पण, त्याआधी वरळीचे फ्लड गेट का काढले, इतर ठिकाणच्या फ्लड गेटचा काय फायदा झाला, याची उत्तरे पालिकेने द्यावीत. हा पालिकेचा नवा फ्लड गेट घोटाळा आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.