मुंबई- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनी जाहीर करण्यात आले.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ही आघाडी भाजपाला विरोध करण्यासाठी झाली आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी यांची आघाडी झाली आहे. भाजपावर शिवसेना-वंचितच्या आघाडीचा कोणताही परिणाम पडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांनी आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही विधान केलं. माझ्यासाठी त्यांनी मातोश्रीचे दार बंद केले, त्याबाबत मला आजही वाईट वाटतं. माझे वैयक्तिक वैर नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
मी आजही उद्धव ठाकरेंसोबत बोलू शकतो. एकत्र चहा पिऊ शकतो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. रश्मी वहिनी मला परवाच एका कार्यक्रमात भेटल्या होत्या. आमचं बोलणंही झालं. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना माझा नमस्कार सांगा, असंही म्हणालो, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"