Join us

आजही जोरदार सरी कोसळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:49 AM

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी मुंबईत दमदार हजेरी लावली.

मुंबई : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. सकाळपासून शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने, हवेतील गारवा वाढला होता, तर सलग पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग किंचित कमी झाला होता. तथापि, रविवारची सुट्टीअसल्याने आणि रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण कमी असल्याने, पावसाचा तसा फारसा फटका मुंबईकरांना बसला नाही.मुंबईकरांची रविवारची सकाळच पावसाने सुरू झाली. भारतीय हवामान शास्त्रीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारीही मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.>दुपारनंतर जोर पुन्हा वाढलासकाळी ११ ते १ वाजेदरम्यान विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दुपारी १ वाजता जोर पकडला. दादर, माटुंगा, सायन व कुर्ला परिसरात पावसाने फटकेबाजी केली. २ वाजता पावसाचा जोर पुन्हा ओसरला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धावपळ झाली. नवी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातही रविवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे.>भुशी धरणात पर्यटक बुडालापुणे जिल्ह्यात भुशी धरणात पोहताना बुडून रविवारी सायंकाळी तिरुपती राजाराम उल्लेवाड (२५) याचा मृत्यू झाला. तो मूळचा नांदेडचा होता. तो मित्रांसोबत आला होता. नांदेड जिल्ह्यात मांजरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या विकास श्यामराव पवारे (२२) याचा वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकल्याने शनिवारी बुडून मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात शेततळ्यात पोहताना विशाल बालाजी हिंगमिरे (१६) याचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला.