मुंबई : लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दैनिक लोकमत आणि केळकर एज्युकेशन ट्रस्ट स्थापित, वि. ग. वझे काॅलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होत रक्ताचे नाते जपले. यावेळी कोसळणाऱ्या पावसातही तरुणाईने रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर पालक, शिक्षकांंनी असे एकूण ४० जणांनी रक्तदान केले. तसेच मुसळधार पावसातही विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणाहून रक्तदानात सहभागी झाले होते.
केळकर कॉलेजच्या जिमखाना सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खेळ संचालक बारीक गिरी, फोर्टिस रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. आलिशा केरकर, तसेच केळकर कॉलेज जिमखाना कमिटीचे सचिव प्रतीक आव्हाड, संजीवनी पाटील तसेच पदाधिकारी ऋषभ साळसकर, यश गोजरे, साहील गौरखेडे, पराग परब, संकेत भांगरे तसेच सदस्य तसेच एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणींंचाही विशेष सहभाग पहावयास मिळाला. कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत, तर ४० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे.
कोरोनाच्या महामारीत सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आमच्या विद्यार्थ्याकडून वेगवेगळया उपक्रमाद्वारे सामाजिक वारसा जपण्याची धडपड सुरू असते. रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठदान नाही. स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठी जगायला हवे, असे कॉलेजचे खेळ विभागाचे संचालक बारीक गिरी यांनी सांगितले.
आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले
आजच्या तरुण पिढीने रक्तदानाच्या कार्यात पुढे यायला हवे. आपल्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकते. रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही फक्त एक पाऊल उचलत आमचे कर्तव्य पार पाडले.
- प्रतीक आव्हाड, सचिव, जिमखाना, केळकर कॉलेज