समीर कर्णुक, मुंबईमहापालिकेच्या ‘एन’ वॉर्डमधील काही सोसायट्यांमध्ये पाणी साठवण्याची पर्यायी व्यवस्था नसतानाही पालिकेकडून संबंधितांना दररोज हजारो लीटर पाणी पुरवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काही सोसायट्यांना जलवाहिनीतून नियमित पाणीपुरवठा होत असतानाही त्या सोसायट्यांनाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी महापालिकेकडून माहिती अधिकार अंतर्गत टँकरचा तपशील मागितल्यानंतर कोट्यवधींचा टँकर घोटाळा उघड झाला आहे. पालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि पाणीमाफिया यांनी सामान्य जनतेसाठी पालिकेकडून स्वस्त दरात पाणी विकत घेत हेच पाणी मोठ्या सोसायटी आणि विकासकांना विकत कोट्यवधींचा टँकर घोटाळा केला आहे. यासाठी बोगस सोसायट्या आणि काही मंडळे स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या नावाने पालिकेकडून पाणी घेत तेच पाणी बाहेर दामदुपट्टीने विकण्यात आले आहे.घाटकोपर पश्चिमेकडील भाजपा आमदार राम कदम राहात असलेल्या आॅर्चिड रेसिडेन्सी सोसायटीतही दररोज १७ टँकर याप्रमाणे १५ दिवसांत २५५ टँकर देण्यात आले आहेत. या सोसायटीत महापालिकेच्या जलवाहिन्यांची जोडणी आहे. तरीही येथे लाखो लीटर पाणी टँकरने पुरवण्यात आले आहे. घाटकोपर पूर्वेकडील मनसेच्या नगरसेविका मंगल कदम यांच्या विभागात त्यांचे पती परमेश्वर कदम यांच्या खासगी सोसायटीसाठी; जेथे एसआरए प्रकल्प सुरू असलेल्या सोसायटीच्या नावावर ७ हजार ९७५ टँकर मागवले आहेत. या संक्रमण शिबिरात पाणी साठवण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसताना हे पाणी गेले कुठे, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. तर काही परिसरात टँकरसाठी रस्ता नसतानाही टँकरने पाणीपुरवठा केल्याचे महापालिकेच्या जल विभागाकडून दाखवण्यात आले आहे.
साठवणूक क्षमता नसतानाही सोसायट्यांना हजारो लीटर पाणी
By admin | Published: August 08, 2016 3:23 AM