मुंबईला यंदाच्या पावसातही ‘मगर’ मिठी, कोरोनापेक्षा पाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 02:35 AM2020-06-12T02:35:49+5:302020-06-12T02:35:55+5:30
नदीलगतच्या नागरिकांना कोरोनापेक्षा पाण्याची भीती
मुंबई : मान्सून दाखल होण्यास आता अवघे काही तास शिल्लक असताना मुंंबई शहर आणि उपनगरातील मिठी नदी, छोटे आणि मोठे नाले साफ करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला. प्रत्यक्षात मुंबई महापालिकेच्या या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे असून, येत्या पावसाळ्यात मिठी नदी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे छोटे-मोठे नालेसुद्धा पुरेशा प्रमाणात साफ झाले नसल्याने कोरोना राहिला दूर, नदीलगत वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना मिठीची भीती वाटत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरामधील मोठे नाले, मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येते. छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम संबंधित विभागीय कार्यालयांकडून करण्यात येते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरामधील मोठ्या नाल्यातील व मिठी नदीमधील पावसाळापूर्व नालेसफाईची हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. छोट्या नाल्यांचे पावसाळापूर्व नालेसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. मोठ्या नाल्याची सरासरी ११२.०० टक्के, मिठी नदीची सरासरी १०५ टक्के आणि छोट्या नाल्याची सरासरी ८५ टक्के नालेसफाईचे काम झाले आहे. नालेसफाईच्या कामांव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सबवेसह, ज्या सखल ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा एकूण ३०८ ठिकाणी उदंचन संच तैनात करण्यात आलेले आहे. वॉचडॉग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गॉडफ्रे पिमेंटा यांच्या म्हणण्यानुसार, मरोळ, कुर्ला आणि सहार येथील दहा टक्केही काम झालेले नाही. विमानतळालगत जे नाले आहेत; त्या नाल्यांच्या सफाईचे काम झालेले नाही. पावसाळा तोंडावर आला तरी परिस्थिती आहे तशी आहे. छोटे-मोठे नाले जाऊन मिठी नदीला मिळतात. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. गाळ काढणे म्हणजे नाल्यातील प्लास्टिक काढणे नव्हे तर प्रत्यक्ष गाळ काढणे होय. विमानतळालगत मेट्रोची कामे सुरू आहेत. येथील शांतीनगरमध्ये जे नाले आहेत; त्यात मेट्रोच्या कामाचे पाणी सोडले. यात गाळही आहे. नाल्याची क्षमता कमी झाली आहे. दोन ते तीन दिवस पाऊस पडला तर पूरसदृश स्थिती निर्माण होईल. थोडक्यात काय तर पावसाळ्यात कोरोनाची नाही तर मिठीची भीती वाटेल, अशी अवस्था आहे.
एलबीएस पाण्याखाली जाणार
मिठी नदीच्या साफसफाईबाबत सातत्याने महापालिकेसोबत पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनी सांगितले की, केवळ कुर्ला येथील मिठी नदी नाही तर मरोळ, साकीनाका, कुर्ला येथील शीतल सिग्नल, कुर्ला येथील कल्पना सिनेमा, कमानी जंक्शन, कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानक, कुर्ला बस डेपो येथे दरवर्षी पाणी साचते. विशेषत: कुर्ला ते सायनदरम्याचा बहुतांश भाग म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस) मोठ्या पावसात पाण्याखाली जातो. यावर उपाय म्हणून मिठी वाहत असलेल्या बीकेसीमध्ये सफाईची नितांत गरज आहे. जिथे खरी गरज आहे; तेथे मिठीसह नाल्यांची सफाई अपेक्षित आहे.
महापालिका म्हणते; पाणी साचण्यास आळा बसेल
मुंबई शहर आणि उपनगरामधील मोठे नाले, मिठी नदी आणि छोटे नाले यामधील पावसाळापूर्व गाळ काढण्याची कामे करण्यात आलेली आहेत. पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या उपनगरातील सबवेसह सखल जागी आवश्यक ते उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत. पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे.
मिठी नदी निम्मीही साफ झालेली नाही
पावसाळ्यात यावर्षी खूप त्रास होणार आहे. कारण मान्सूनची नालेसफाई पुरेशी झालेली नाही. मुळात नालेसफाईच्या निविदाच विलंबाने निघाल्या. त्यामुळे माझ्या वॉर्डबाबत बोलायचे झाल्यास नालेसफाईचे काम २५ ते ३० टक्के झाले आहे. माझ्या वॉर्डमध्ये ही परिस्थिती आहे. बाकी मुंबईत हीच परिस्थिती असणार आहे. मिठी नदीबाबत बोलायचे झाल्यास मिठी नदीच्या निविदेत वस्तुस्थिती नाही. मिठी नदी पूर्ण साफ केली, असे दाखविले जाते. पण मिठी नदी निम्मीही साफ केली जात नाही. गेल्या वर्षी क्रांतिनगरमध्ये पाच वेळा पाणी भरले. मिठी नदी साफ झाली असे म्हणतात. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती ही नाही.
- संजय तुर्डे, नगरसेवक, मनसे, कुर्ला (एल वॉर्ड)