Join us

"निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट, महिलेचा मृत्यू"; रोहित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 8:41 AM

किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार?, असा सवाल रोहित यांनी केला.

मुंबई/नागपूर - आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय पक्षांकडून कार्यक्रम आणि सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. नागपुरात भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी अशाच प्रकारे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ देत काही वस्तू देण्यात येत होत्या. मात्र, येथील कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार?, असा सवाल रोहित यांनी केला.

राज्य सरकारतर्फे गतवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. नवी मुंबईत खुल्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरी १२ जणांपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर, विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता, पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत भाजपावर निशाणा साधला. 

''महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या इव्हेंटमध्ये खारघरला अनेकांचा मृत्यू होऊनही राजकीय इव्हेंट करण्याची भाजपची हौस काही भागत नाही. म्हणूनच, निवडणूक डोळ्यापुढं ठेवून नागपूरमध्ये भाजपने घेतलेल्या इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका निष्पाप महिलेला जीव गमवावा लागला. अशा अजून किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजप आपल्या राजकीय भाकरी भाजणार आहे?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, ४५० रुपयांचा सिलिंडर १२०० रुपयांवर नेताना गरिबांची आठवण कधी झाली नाही, पण निवडणुका आल्यावरच भाजपला गरिबांची बरी आठवण होते, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, नागपुरातील या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता. 

नेमकं काय घडलं

मनूबाई तुळशीराम राजपूत (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण होणार होते. सकाळी १० वाजल्यापासून शिबिराची वेळ होती. मात्र, सकाळी सातपासूनच सुरेश भट सभागृहासमोर हजारो लाभार्थ्यांची गर्दी जमली. सव्वा दहानंतर सभागृहाचे दार उघडले असता, आत जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यामुळे गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. चेंगराचेंगरीदरम्यान मनूबाईंच्या अंगावरून अनेक जण गेले. त्यात, त्यांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :रोहित पवारनागपूरमुंबईमहिलाभाजपा