Join us  

"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:52 AM

यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महायुतीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून आता विविध आश्वासनं दिली जात आहेत. यात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी राबवलेल्या एका कार्यक्रमामुळे त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. 

यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आता हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांचा आठवण कशी झाली, असा सवाल करत विरोधकांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे, याबाबत भाजपने देखिल आक्षेप घेतला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आशिष शेलार यांना यामिनी जाधव यांच्या कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, नेमका काय कार्यक्रम घेतला, याची मला माहिती नाही. पण बुरखा वाटप सारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत. शिवसेनेने त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर आवश्य मत प्रदर्शित करावे. अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणे भाजपला मान्य नाही, असे आशिष शेलार यांनी सुनावले.

दरम्यान, यामिनी जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी आपल्या मतदारसंघात १००० बुरखा वाटले होते. या कार्यक्रमानंतर शिवसेना ठाकरे गटानेही महायुतीवर टीकेची झोड उटविली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, यामिनी जाधव यांचे कृत्य दुटप्पीपणा आणि स्वार्थी राजकारणाचा कळस आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाची मते मिळाली नाहीत, म्हणून एका बाजूला रडगाणे गाणाऱ्या शिंदे गटाने मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेष पसरविण्याचे काम केले. आता मुस्लीम मतपेटीला आकर्षित करण्यासाठी आमदार यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपासारखे कार्यक्रम घेतले जात आहेत.

काय म्हणाल्या यामिनी जाधव?आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना यामिनी जाधव म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात जवळपास ५० टक्के मुस्लीम समाज राहतो. माझे पती यशवंत जाधव हे ३० वर्षांपासून या विभागात नगरसेवक म्हणून काम करत आहेत. दिवाळीला आम्ही हिंदूंना भेटवस्तू वाटतो, पण मुस्लीम समाजासाठीही काहीतरी करावे, या कल्पनेतून बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मुस्लीम समाजातील महिला बुरखा वापरतात, त्यामुळे आम्ही बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. आमच्या मित्रपक्षांचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो, पण आम्हाला आमच्या मतदारसंघाची काळजी घ्यावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभेला दणका, विधानसभेची चिंता! लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा ५२ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत यामिनी जाधव, ज्या भायखळा विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदार संघातून अरविंद सावंत यांना सर्वाधिक मतं मिळाली होती. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीची चिंता यामिनी जाधव यांच्यासमोर आहे. दरम्यान, भायखळ्यात मुस्लिम मतदारांचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. विधानसभेत मुस्लिम महिलांनी विरोधात मतदान करू नये, यासाठी यामिनी जाधव दक्ष झाल्या असून त्याकरिता त्या कामाला लागल्या आहेत.

टॅग्स :आशीष शेलारयामिनी जाधवशिवसेनाभाजपामुंबई