मुलुंडमधील घटना : टोइंग केलेली दुचाकी गाडीवरून उतरवून दिली धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:23 AM2017-11-15T03:23:47+5:302017-11-15T03:24:33+5:30
मालाड टोइंग प्रकरण गाजत असताना मुलुंडमध्ये टोइंग केलेली दुचाकी टोइंग व्हॅनवरून खाली उतरवून दुचाकीस्वारानेच वाहतूक पोलिसाला धमकावल्याचा प्रकार सोमवारी घडला.
मुंबई : मालाड टोइंग प्रकरण गाजत असताना मुलुंडमध्ये टोइंग केलेली दुचाकी टोइंग व्हॅनवरून खाली उतरवून दुचाकीस्वारानेच वाहतूक पोलिसाला धमकावल्याचा प्रकार सोमवारी घडला. या प्रकरणाचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. वाहतूक पोलिसाने दिलेल्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलुंड वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार मनोज पवार सोमवारी सकाळी टोइंग व्हॅनवर कर्तव्यावर होते. सोमवारी सकाळी नो पार्किंगमधील दुचाकी टोइंग करत ते एन. एस. रोडवर पोहोचले. तेथे त्यांना एमएच ०३ सीसी ३२२५ ही स्कूटी नो पार्किंगमध्ये दिसली. ती दुचाकी कुणाची आहे, याबाबत त्यांनी संबंधित सुरक्षारक्षकांकडे विचारणा केली. त्यानंतर पवार यांनी ती गाडी टोइंग व्हॅनवर ठेवून ते निघाले. त्याचदरम्यान तेथे आलेल्या एकाने आरडाअोरड केली. त्यांनी त्याला दंड भरून गाडी वाहतूक विभागातून घेऊन जाण्यास सांगितले. मात्र संबंधित दुचाकीस्वार दादागिरी करत टोइंग व्हॅनवर चढला. त्यानंतर क्रेनचा बूम तोडून त्याने गाडी खाली उतरवली आणि दंड न भरता गाडी घेऊन तो पसार झाला.