मुंबई : विक्रोळी येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर सेनेच्या उपशाखाप्रमुखाने उभारलेल्या अनधिकृत घरांवर अखेर गुरुवारी महापालिकेचा हातोडा पडला. शिवसेनेच्या दबावाला न जुमानता पालिका प्रशासनाने गुरुवारी ही घरे जमीनदोस्त केल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.विक्रोळी टागोरनगर येथील ग्रुप क्रमांक ४ येथे प्रिन्स चाळ परिसरालगत गेल्या चाळीस वर्षांपासून रहिवासी वास्तव्यास आहेत. रेल्वेच्या ५ आणि ६ क्रमांकाच्या रुळाच्या कामासाठी बाधित ठरणाऱ्या यापैकी काही झोपड्या निष्कासित करत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. त्यानंतर विविध सण, समारंभांसाठी वापरत असलेला हा भूखंड लाटण्यासाठी सेनेच्या उपशाखाप्रमुख महेंद्र कदम यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात रातोरात दोन ते तीन पक्की घरे उभारल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. तथापि, कदम यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये १७ जूनच्या अंकात वाचा फोडण्यात आली. याची दखल घेत पालिका अधिकाऱ्यांनी विभागाला तोडक कारवाईची नोटीस पाठवली. पालिकेच्या तोडक कारवाईचा हातोडा पडण्याआधीच या उपशाखाप्रमुखाने बांधकामावर तोडक कारवाईचे नाटक मागील आठवड्यात केले. दरम्यान, त्यावेळी स्थानिक महिलांसह नागरिकांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी उपशाखाप्रमुख महेंद्र कदमविरोधात केवळ अदखलपात्र तक्रारीची नोंद केली होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी एस विभाग पालिका साहाय्यक पालिका आयुक्ताने सेनेच्या दबावाला न जुमानता या अवैध बांधकामावर हातोडा चढविला. दुपारी साडेबारा वाजल्यापासून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. यामध्ये उभारलेली अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. (प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्त‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी एस विभाग पालिका साहाय्यक पालिका आयुक्ताने सेनेच्या दबावाला न जुमानता या अवैध बांधकामावर हातोडा चढविला. दुपारी साडेबारा वाजल्यापासून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.
अखेर ‘त्या’ अवैध बांधकामावर हातोडा
By admin | Published: July 03, 2015 2:14 AM