लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करून त्यांची परदेशात कबुतरबाजी करणाऱ्या टोळीतील पंजाबमधील मुख्य सूत्रधाराला गुरुवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जबरी चोरी-दरोडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. बिक्रमजित सिंग असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील हा १४वा आरोपी आहे. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडाविरोधी पथकाने मुंबई विमानतळावरून चार अल्पवयीन मुलांची सुटका केल्यानंतर हे मानवी तस्करीचे जाळे उघडकीस आले. या प्रकरणात चित्रपटात करणारा अस्लम आरिफ फारुकी (३८) या मुख्य सूत्रधारासह १३ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. पंजाबच्या अमृतसर भागातून सिंगच्या मदतीने या मुलांची तस्करी होत आहे. सिंग हा यामागील मुख्य दलाल असून, तो फारुकीसोबत संपर्क साधून या मुलांना मुंबईत पाठवत असे. त्यानंतर फारुखी मुंबईतील अन्य साथीदारांशी संपर्क करून या मुलांना त्यांच्या ताब्यात देत असे. सिंगचा मुलांच्या पालकांसोबत थेट संपर्क होता. पैशांचा व्यवहारदेखील तोच करीत असे. तो मुलांची संपूर्ण माहिती फारुकीला देत नव्हता. त्यामुळे त्याला आणि त्याच्या साथीदाराकडे चौकशीत मुलांची अर्धवट माहिती मिळत होती. अखेर सिंगच्या अटकेसाठी पंजाबमध्ये सापळा रचून बसलेल्या तपास पथकाच्या जाळ्यात तो अडकला. त्याला गुरुवारी मुंबईत आणण्यात आले आहे.
अखेर पंजाबमधील एजंटलाही अटक
By admin | Published: June 23, 2017 3:33 AM