अखेर ‘ती’ची मृत्यूशी झुंज ठरली अयशस्वी; बलात्कारप्रकरणी नराधम टेम्पोचालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:03 AM2021-09-12T05:03:40+5:302021-09-12T05:04:47+5:30

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात  साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे.

eventually she failed to cope with death and tempo driver arrested for rape pdc | अखेर ‘ती’ची मृत्यूशी झुंज ठरली अयशस्वी; बलात्कारप्रकरणी नराधम टेम्पोचालकाला अटक

अखेर ‘ती’ची मृत्यूशी झुंज ठरली अयशस्वी; बलात्कारप्रकरणी नराधम टेम्पोचालकाला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात  साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या  महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने जबर जखमी झालेल्या अबलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साकीनाका खैरानी रोडवरील चांदिवली स्टुडिओच्या रशीद कम्पाउंडजवळ  एक जण टेम्पोमध्ये महिलेला मारहाण करीत असल्याचे  या परिसरातील पुठ्ठ्याच्या कारखान्यातील कंपनीत काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने  शुक्रवारी मध्यरात्री ३.२० वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे निरीक्षक ढुमे व पथक १० मिनिटांत तेथे पोहोचले. एक महिला टेम्पोमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यांनी तिला त्याच टेम्पोतून तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती बेशुद्धावस्थेत होती. अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. 

मात्र, खूप खोलवर जखमा झाल्या असल्याने  शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी विविध पथके नेमून हल्लेखोराचा शोध सुरू केला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पथकांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. तो अन्य जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत  असताना त्याला शिताफीने पकडण्यात आले. पीडित महिलेला दोन मुली असून, या मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार आणि शिवसेना घेणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले. 

- महिला सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. टेम्पो चालक म्हणून काम करणाऱ्या मोहन चौहानला दारूचे व्यसन असून त्याने एकट्याने हे कृत्य केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याचा भाऊ व बहिणीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचेही नगराळे म्हणाले.

- या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

राज्य महिला आयोगाने अहवाल मागविला

साकीनाक्यात महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्ताकडून अहवाल मागविला आहे. अध्यक्षपद रिक्त असले तरी विभागाच्या सचिवांनी त्याबाबत मागणी केली आहे. ही घटना अत्यंत निषेधार्थ आहे, त्याबाबत मुंबई पोलिसांनी कोणती कारवाई केली, याबद्दल तपशीलवार अहवाल पाठविण्याची सूचना विभागातर्फे करण्यात आली आहे.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून एक महिन्यात दोषारोप पत्र दाखल केले जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

ही घटना सुन्न करणारी आहे. बलात्काराच्या घटना महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का लावणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना वारंवार होत असतील तर कायद्याचा धाकही राहत नाही. सरकार केवळ नियमबाह्य बदल्यांमध्ये व्यस्त आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते
 

Web Title: eventually she failed to cope with death and tempo driver arrested for rape pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.