अखेर मालाडच्या उद्यानाचे टिपू सुल्तान नाव हटवले; मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करून दिली माहिती
By मनोहर कुंभेजकर | Published: January 27, 2023 07:31 PM2023-01-27T19:31:01+5:302023-01-27T19:31:28+5:30
मालाड पश्चिम मालवणी येथील टिपू सुल्तान यांच्या नावे असंलेली उद्यानाची पाटी काल उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने हटवली आहे.
मुंबई : मालाड पश्चिम मालवणी येथील टिपू सुल्तान यांच्या नावे असंलेली उद्यानाची पाटी काल उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने हटवली आहे.आज उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. दरम्यान मैदानाला अमर शहीद अशफ़ाक उल्ला खान यांचं नाव देण्याच्या मुद्यावर कॉंग्रेस-भाजपचं एकमत झाल्याचे सर्वप्रथम लोकमत ऑनलाईन मध्ये दि.१८ रोजी आणि लोकमत मध्ये दि,२० रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.लोकमतच्या वृत्ताची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
या वृत्ताची पुष्टी आज उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. कॉंग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख देखील याच नावासाठी आग्रही असल्याचे समजते.
गेल्या वर्षी बरोबर एक वर्षांपूर्वी दि,२६ जानेवारी २०२२ रोजी या सरकारी उद्यानाचे टिपू सुल्तान उद्यान असे अनधिकृतपणे नामकरण केले होते. विशेष म्हणजे पालिका आणि सरकारची या नामकरणावरून नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते. वांद्रे पूर्व चेतना महाविद्यालयात दि,१७ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उत्तर मुंबईचे खासदार आणि आमदारांनी सदर नाव काढण्यात यावे अशी आग्रही मागणी केली होती.त्यानुसार काल सदर नाव हटवण्यात आले असून नवीन नामकरण उदघाटन सोहळा आपण स्वतःकरणार असल्याचे मंत्री लोढा यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मालाड पश्चिम मालवणी येथे महविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन पालक मंत्री असलम शेख यांनी आपल्या आमदार फंडातून दि,२६ जानेवारी २०२२ मध्ये एका मैदानचे नूतनीकरण केले होते. यावेळी आ.असलम शेख यांनी या मैदानाचे टिपू सुल्तान
असे नामकरण केले होते.येथील मैदानाला 'टिपू सुल्तान' यांचं नाव देण्यावरुन कॉंग्रेस-भाजपात फार मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितिची बैठकीत उत्तर मुंबईतील मालाड पश्चिम मालवणी येथील
टिपू सुल्तान मैदानावरुन पुन्हा घमासान बघायला मिळाले.तर या उद्यानाला स्वातंत्र्यसैनिक अशफ़ाक उल्ला खान यांच्या
नावाच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस-भाजपात अखेर एकमत झाल्याचे दिसून आले.तर त्याआधी या बैठकीत उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यात शाब्दीक खडाजंगी देखिल पाहायला मिळाली होती.
टिपू सुल्तान यांच्या नावे असलेली उद्यानाची असलेली पाटी काढून भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मैदानाला स्वातंत्र्यसैनिक अशफ़ाक उल्ला खान यांचं नाव देण्याची मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही आपल्या मागणी संदर्भात उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत मैदानाला अशफ़ाक उल्ला खान यांचे नाव दिले नाही तर आपण स्वत: जाऊन त्या मैदानाचं नामकरण करण्याची भूमिका आक्रमकपणे खासदार शेट्टी यांनी मांडली होती.
दरम्यान मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती बैठकीत कॉंग्रेस-भाजपात मिले "सूर मेरा तुम्हारा"चित्र पाहायला मिळाले होते. आमदार अस्लम शेख यांनी खासदार शेट्टी यांच्या सूरात सूर मिसळत स्वातंत्र्य सैनिक अशफ़ाक उल्ला खान यांचे नाव मैदानाला देण्यासंदर्भात आपण देखील यापूर्वी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. या उद्यानाला अशफ़ाक उल्ला खान यांच्या नावाच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस-भाजपात अखेर एकमत झाले होते.