दर पाचव्या मुंबईकराला मधुमेहाचा धोका!
By Admin | Published: November 14, 2016 05:03 AM2016-11-14T05:03:17+5:302016-11-14T08:49:53+5:30
घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर खरेतर सुस्त, व्यायाम न करणारे आणि अति खवय्ये आहेत. अशा जीवनशैलीमुळे होणाऱ्या मधुमेहाचा धोका मुंबईकरांना अधिक
पूजा दामले / मुंबई
घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर खरेतर सुस्त, व्यायाम न करणारे आणि अति खवय्ये आहेत. अशा जीवनशैलीमुळे होणाऱ्या मधुमेहाचा धोका मुंबईकरांना अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुंबईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दर पाचव्या मुंबईकराला मधुमेहाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘डॉ. गाडगेज डायबेटिस केअर अॅण्ड रिसर्च सेंटर’तर्फे बोरीवली आणि कांदिवली परिसरातील दीड हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. बोरीवली स्थानक, पोईसर जिमखाना, नॅशनल पार्क, चिकूवाडी येथील जॉगर्स पार्क, चारकोपमधील वीर सावरकर गार्डन या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणाला सुरुवात करण्याआधी जास्तीतजास्त १० टक्के जणांना मधुमेह असेल असा अंदाज होता. पण, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी तब्बल २० टक्के जणांना मधुमेह असल्याचे आढळून आल्याची माहिती मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मधुमेहाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मुंबईकरांना डोळ्यांसमोर ठेवून सर्वेक्षण करताना दर पाचव्या मुंबईकराला मधुमेहाचा धोका असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात अजून एक धक्कादायक बाब समोर आली. जितक्या जणांना मधुमेह आढळून आला त्यापैकी ५१.२ टक्के जणांचा मधुमेह हा नियंत्रणात नसलेला मधुमेह (अनकंट्रोलेबल डायबेटिस) असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वेक्षणात महिलांचाही समावेश होतो. मधुमेह असणाऱ्यांपैकी २६ टक्के महिला होत्या. अनेक जणांचे वजन अधिक असते तरीही व्यायाम करत नाहीत. त्यामुळे असे अनेक जण हे मधुमेहाच्या विळख्यात अडकू शकतात. अनेक जण डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांना मधुमेह, रक्तदाब असे आजार असले तरी कळत नाहीत. जेव्हा लक्षणे दिसू लागतात अथवा काही त्रास जाणवतो तेव्हा ते डॉक्टरांकडे येतात. अशावेळी गुंतागुंत वाढलेली असते. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. गाडगे यांनी सांगितले.