प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात; पहिले पाऊल उपक्रमाचा मुंबईतून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 07:03 AM2023-04-26T07:03:10+5:302023-04-26T07:03:37+5:30

शिक्षणमंत्री : ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उपक्रमाचा वरळी सी फेस शाळेतून प्रारंभ

Every child will enter the education stream; The first step is to start the initiative from Mumbai | प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात; पहिले पाऊल उपक्रमाचा मुंबईतून प्रारंभ

प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात; पहिले पाऊल उपक्रमाचा मुंबईतून प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  महाराष्ट्राला शिक्षणाची दीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसारखे आदर्श घरोघरी निर्माण करण्याचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिका शिक्षण विभाग आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण (मुंबई) यांच्यातर्फे आयोजित व ‘स्टार्स’ प्रकल्पअंतर्गत शाळापूर्व तयारी अभियान-२०२३ ‘पहिले पाऊल’ शाळास्तर उद्घाटन मेळावा मंगळवारी पालिकेच्या वरळी सी फेस येथील शाळेमध्ये पार पडला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, महापालिकेचे सहआयुक्त (शिक्षण)  अजित कुंभार, पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी मालती टोणपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकविले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा, असेही आवाहन शिक्षणमंत्र्यांनी यावेळी केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना गणवेश, बूट-मोजे, वह्या-पुस्तके दिली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांनी शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

शिक्षणमंत्र्यांसह विद्यार्थ्यांचा सेल्फी...
     प्रारंभी शाळेतील लेझीम पथकाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी शाळेतील चिमुकल्यांशी संवाद साधला. सेल्फी घेताना श्री. केसरकर यांनी चिमुकल्यांना उचलून घेतले. त्यामुळे लहानग्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 
     मान्यवरांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशपात्र मुलांच्या क्षमतांच्या तपासणीसाठी मांडण्यात आलेल्या विविध संचांना भेट दिली.

Web Title: Every child will enter the education stream; The first step is to start the initiative from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.