मुंबईत दररोज १,४५० दशलक्ष लिटर सांडपाणी जाते थेट समुद्रात!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:23 AM2019-12-11T04:23:21+5:302019-12-11T04:24:01+5:30
नदी, नाल्यांतून सांडपाणी जाते थेट समुद्रात; आरोग्याचाही प्रश्न, प्रक्रिया केंद्रातून हलगर्जी होत असल्याचा आरोप
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईतून दररोज सरासरी साडेचौदाशे दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करून थेट समुद्रात सोडले जाते. ही प्रक्रियादेखील केवळ नावालाच असते. याशिवाय प्रक्रिया न करता समुद्रात जाणाऱ्या पाण्याची आकडेवारीदेखील उपलब्ध नाही. या सांडपाण्यामुळे समुद्र जीवसृष्टी धोक्यात आली आहे.
मुंबईची लोकसंख्या आजघडीला १ कोटी ३० लाख आहे. पाण्याची दररोजची मागणी ४,४५० दशलक्ष लिटर असून, प्रत्यक्षात ३,७५० दशलक्ष लिटर इतकाच पुरवठा होतो. सुमारे २५ टक्केसांडपाणी हे सकाळी ६ ते १० या वेळेत उत्सर्जित होते. सांडपाण्याचे व मलजलाचे व्यवस्थापनासाठी कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, घाटकोपर व भांडुप, अशी सात प्रक्रिया केंद्रे आहेत. या पाण्यावर तीन प्रक्रिया होणे अपेक्षित असताना केवळ एकच प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेले जवळपास साडेपाच एमएलडी पाणी उद्यानांसाठी वापरले जाते. त्यामुळे या पाण्याचीही तपासणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
याशिवाय नदी, नाल्यांसह उर्वरित घटकांद्वारे थेट समुद्रात मिसळले जाणारे सांडपाणी वेगळेच. हे पाणी किती, याची कुठलीही आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही. या सांडपाण्यामुळे मुंबईच्या समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे दररोज ४०० मेगा लिटर म्हणजे चार कोटी लिटर सांडपाणी समुद्रात सोडले जाते. या पाण्यावर तीन टप्प्यांत प्रक्रिया करणे अपेक्षित असताना त्यावर केवळ प्राथमिक प्रक्रिया करून म्हणजेच गाळून ते पाणी समुद्रात सोडले जाते.
केंद्र आणि राज्याची मदत घ्यावी
मुंबई शहर आणि उपनगरातून समुद्रात सोडल्या जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया झालीच पाहिजे. महानगरपालिकेने ती केली पाहिजे. प्रशासनाने यासंदर्भातील यंत्रणा सातत्याने अद्ययावत केली पाहिजे. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रक्रिया केंद्र उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन मदत करते, ती घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. - संजय शिंगे, संस्थापक अध्यक्ष, ह्युमॅनिटी फाऊंडेशन
मुंबईत प्रदूषित आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात जात आहे. त्याचबरोबर प्लास्टिक आणि कचरादेखील जात आहे. त्यामुळे मुंबईतील सागरी परिसंस्था प्रदूषित झाली आहे. सरकारने तातडीने समुद्रात जाणाºया सांडपाण्याची तपासणी करावी, तसेच ज्या कारखान्यांमधून दूषित पाणी समुद्रात जात आहे, त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा मुंबईचे सागरी जीवन संपून जाईल.
- प्रदीप पाताडे, सागरी जीव अभ्यासक
दररोज १,४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया
मुंबई मनपाच्या सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रात तीन टप्प्यांत प्रतिदिन १ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते. नंतर हे पाणी समुद्रात सोड२२ले जाते. त्यामुळे समुद्र आणि जलचराला धोका नसल्याची प्रतिक्रिया पालिका अधिकाºयाने दिली.