मुंबई : महिला आता अबला राहिलेल्या नसून आपल्या न्यायहक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या महिलांसाठी दररोजच महिला दिन साजरा व्हावा, अशी अपेक्षा अभिनेत्री आसावरी जोशी यांनी व्यक्त केली.
जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि शुद्धी महिला विकास फाऊंडेशनतर्फे चारकोप येथे पार पडलेल्या पाककला स्पर्धा, महिला संरक्षण वर्ग शुभारंभ, गॅस सिलिंडर सेफ्टी क्लिनिक या विविध कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजिका बोरीवली विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रेश्मा निवळे म्हणाल्या की. केवळ स्पर्धेपुरता हा विषय मर्यादित नाही. स्पर्धेसाठी हेतूपुरस्सर पारंपरिक खाद्यपदार्थ मागवण्यात आले होते. कोकणातील शिरवाळ्या, खापरपोळीसह राज्यातील सर्व भागातील खाद्यपदार्थ या स्पर्धेसाठी सादर झाले.
या पाककौशल्याच्या माध्यमातून महिलांनी सकस आणि पौष्टिक खाद्यपदार्थांच्या उद्योगाकडे वळावे आणि आपल्या पायावर उभे राहावे, हीच या उपक्रमामागील अपेक्षा आहे. तब्बल १२0 महिलांनी पाककला स्पर्धेत भाग घेतला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ६00 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.