मुंबई : हॉलिवूड वेब सीरिजच्या ऑडिशनच्या नावाखाली दुबईतील शारजामध्ये खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकलेली ‘सडक २,’ ‘बाटला हाऊस’मध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसॅन परेरा चार महिन्यांनी मुंबईत परतली. कुटुंबीयांच्या भेटीनंतर विमानतळावरच अश्रूंचा बांध फुटला. यावेळी, माध्यमांशी बोलताना, तुरुंगात घालवलेला प्रत्येक दिवस महिन्यासारखा वाटत होता, असे तिने सांगितले.
परेराच्या आईशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपी ॲन्थोनी पॉल (३५) आणि राजेश बोभाटे ऊर्फ रवी यांनी ट्रॉफीतून गांजा पाठवत परेराला अडकवले. शारजा पोलिसांनी ड्रग्जच्या गुन्ह्यात परेराला अटक केली. १ एप्रिलपासून ती शारजामध्ये होती. तीन आठवड्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर, तिची मुक्तता झाली. मात्र, कायदेशीर प्रक्रियेमुळे ती मुंबईला परत येऊ शकली नाही.
अखेर, गुरुवारी पहाटेच्या सुमारास ती मुंबई विमानतळावर उतरली. यावेळी कुटुंबीयांशी गळाभेट घेताच क्रिसॅनला आनंदाश्रू आवरले नाही. त्यानंतर, दुपारच्या सुमारास परेरा हिने पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत आभार मानले.
क्रिसॅन म्हणते...कारागृहातील आठवणी अंगावर शहारा आणतात. माझ्या सेलमध्ये ३० जण होते. मी बांगलादेशी लोकांशी हिंदीत तर, नायजेरियन कैद्यांशी इंग्रजीत संवाद साधायची. तुरुंगात एक मनोचिकित्सक होते, जे माझ्या औषधांची काळजी घ्यायचे. मी घेत असलेली औषधेही सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. १६ दिवस तुरुंगात होते. काही दिवसांनी सर्व आशा गमावल्या होत्या. फक्त, कुटुंब आणि मुंबई पोलिसांमुळे हा कठीण काळ पार करू शकले.