दर दिवशी ते मला सात ते आठ तास प्रश्न विचारतात; आता पुरे करा, अनिल देशमुखांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:46 AM2021-11-13T07:46:30+5:302021-11-13T07:46:35+5:30

अनेक आजार असलेल्या ७२ वर्षांच्या व्यक्तीची १३ तास चौकशी केली. सामान्यतः ते चौकशीसाठी आलेल्या व्यक्तीला संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत बसवतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावतात.

Every day they ask me questions for seven to eight hours; Said Former Home Minister Anil Deshmukh On ED | दर दिवशी ते मला सात ते आठ तास प्रश्न विचारतात; आता पुरे करा, अनिल देशमुखांची विनंती

दर दिवशी ते मला सात ते आठ तास प्रश्न विचारतात; आता पुरे करा, अनिल देशमुखांची विनंती

googlenewsNext

मुंबई : मी गेले १० दिवस ईडी कोठडीत आहेत. दर दिवशी ते मला सात ते आठ तास प्रश्न विचारतात. आता पुरे करा, अशी विनंती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष न्यायालयात शुक्रवारी केली.  शुक्रवारी देशमुख यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयात रिमांडची कागदपत्रे देत देशमुख यांना आणखी तीन दिवस ईडी कोठडी द्यावी, अशी विनंती केली. त्यावेळी देशमुख साक्षीदारांच्या पिंजऱ्यात उभे होते. न्यायालयाने देशमुख यांच्याकडे विचारणा करीत म्हटले की, त्यांना काही बोलायचे आहे का? त्यावर देशमुख  यांनी वरील विनंती केली.

देशमुख यांनी न्यायालयाला पत्रही दिले. त्यात त्यांनी लिहिले आहे की, त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याने त्यांनी ईडीला दिलेला जबाब ते मागे घेत आहेत. ‘निरर्थक प्रश्न विचारून माझी तासनतास चौकशी करण्यात येते. चुकीच्या उद्देशाने सारखे-सारखे तेच तेच प्रश्न विचारण्यात येतात. जेणेकरून माझ्याकडून दरवेळी वेगळी उत्तरे मिळावीत. प्रत्येक प्रयत्न मला गोंधळात टाकण्यासाठी व माझी विचारप्रक्रिया बिघडवण्यासाठी केला जातो.

माझे शरीर ९ ते १० तास सतत तणाव सहन करू शकत नाही, हे त्यांना माहीत आहे. मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर टाळले नाही. मी तपासात पूर्ण सहकार्य केले आहे,’ असे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.‘देशमुख हे प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. वाझे याची त्यात मुख्य भूमिका आहे. पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्या यांबाबत देशमुखांचा जबाब नोंदवावा लागेल. नागपूर येथील एका खासगी व्यक्तीने 'प्रतिष्ठित प्रकल्प' केले आहेत. ती व्यक्ती देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी नियमितपणे येत असे. त्या व्यक्तीचीही चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच काही प्रमुख साक्षीदारांना बोलावले असून त्यांना व देशमुख यांना समोरासमोर करावे लागणार आहे,’ असे ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयाला सांगितले.

‘तुम्ही देशमुख यांचा जबाब नोंदविल्यावर खासगी व्यक्तीला समन्स बजावले? कधी जबाब नोंदविला? ते येतील?’ असे प्रश्न न्यायालयाने ईडीला केले. त्यावर शिरसाट यांनी न्यायालयाला सांगितले की, ११ नोव्हेंबरच्या जबाबावरून खासगी व्यक्तीला समन्स बजावण्यात आले असून, ती व्यक्ती नवी मुंबईत राहते. त्यांना १३ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे हजर राहण्यास सांगितले आहे.

अनेक आजार असलेल्या ७२ वर्षांच्या व्यक्तीची १३ तास चौकशी केली. सामान्यतः ते चौकशीसाठी आलेल्या व्यक्तीला संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत बसवतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावतात. मात्र, त्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला १३ तास बसवून ठेवले आणि मग अटक केली. अशा परिस्थितीत त्यांनी रिमांड अर्ज करणे कितपत योग्य आहे? असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील विक्रांत चौधरी व अनिकेत निकम यांनी केला. 

Web Title: Every day they ask me questions for seven to eight hours; Said Former Home Minister Anil Deshmukh On ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.