‘समाजातील प्रत्येक घटकाने ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे’, राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:24 AM2018-06-17T04:24:52+5:302018-06-17T04:24:52+5:30
समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान करण्याची आवश्यकता असून, या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल, असा विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
मुंबई : समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान करण्याची आवश्यकता असून, या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल, असा विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृहात जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात बडोले बोलत होते. या वेळी बडोले म्हणाले, बदलती जीवनशैली, वाढत्या शहरीकरणामुळे ज्येष्ठांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मुले शहरांकडे नोकरी, व्यवसायाच्या शोधात तर उच्चशिक्षित युवक परदेशात स्थलांतरित झाल्यामुळे ज्येष्ठ आई-वडिलांना गावाकडे एकटेच जीवन कंठावे लागते. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. समाजातूनही त्यांना दुर्लक्षित केले जाते, ही शोकांतिका आहे.
वडिलांच्या संपत्तीवर दावा करून भांडणाऱ्या आणि वडिलांनी संपत्ती आपल्या नावावरच करावी, म्हणून त्यांच्यावर दबाव आणणाºया तीन भावंडांचा दाखला देत बडोले म्हणाले, अखेर त्या ज्येष्ठ नागरिकास वृद्धाश्रमाचाच रस्ता धरावा लागला, ही दुर्दैवी बाब आहे. ज्येष्ठांवरील अत्याचाराविरोधात सर्वच प्रश्न कायद्याने सोडविता येत नाहीत, असेही बडोले यावेळी म्हणाले. या वेळी ज्येष्ठ सिनेअभिनेते रमेश देव यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आयुष्यात आजोबा, वडील आणि आई या ज्येष्ठांनी ऐतिहासिक भूमिका निभावल्यामुळेच यशस्वी व्यक्ती घडल्याची कबुली दिली.