Join us  

प्रत्येक पाचव्या व्यक्तीला झोपेचा आजार

By admin | Published: March 19, 2016 1:19 AM

‘रात्री उशिरापर्यंत झोपच येत नाही’, ‘पलंगावर पडल्यावर झोप येण्याची वाट पाहावी लागते’ असे संवाद अनेकदा ऐकायला येतात. पण, याकडे सररास दुर्लक्ष केले जाते. कारण, दुसऱ्या कुठल्यातरी

मुंबई : ‘रात्री उशिरापर्यंत झोपच येत नाही’, ‘पलंगावर पडल्यावर झोप येण्याची वाट पाहावी लागते’ असे संवाद अनेकदा ऐकायला येतात. पण, याकडे सररास दुर्लक्ष केले जाते. कारण, दुसऱ्या कुठल्यातरी शारीरिक आजाराचे झोप न येणे हे लक्षण समजले जाते. प्रत्यक्षात मात्र ‘झोप न येणे’ हाच एक आजार आहे. जगातील प्रत्येक पाचव्या व्यक्तीला झोपेचा आजार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.‘स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्याेदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्याेदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असल्याचे डॉ. सागर यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वीच सर्वाेच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. झोपेचे कार्य काय?झोपेची प्रमुख दोन कार्ये आहेत. पहिले म्हणजे झोपेमुळे शरीराचा थकवा कमी होतो. दिवसभर काम केल्यामुळे शरीरातील वापरली जाणारी रसायने कमी होतात. दुसऱ्या दिवशी ऊर्जा मिळण्यासाठी शरीरात त्या रसायनांची निर्मिती करणे. रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठल्याने रसायनांची निर्मिती योग्य पद्धतीने होत नाही. शांत झोपेसाठी हे कराझोपण्याची आणि उठण्याची वेळ पाळा, झोपण्यापूर्वी भूक लागली असेल तर हलका आहार घ्या, दररोज व्यायाम करा, झोपण्याआधी एक तासभर शांत व्हा, डोक्यात काही विचार असतील, प्रश्न असतील तर रात्री ते झोपण्यापूर्वी लिहून ठेवा. सकाळी उठल्यावर त्यांचा विचार करावा, झोपण्याची जागा थंड ठेवा, झोपण्याच्या जागेत अंधार हवा, झोपण्याच्या ठिकाणी शांतता हवी.हे करू नका झोप येत नाही म्हणून टीव्ही पाहणे, झोप येण्यासाठी जास्त खाणे, झोप येण्यासाठी दुपारी, सायंकाळी कॉफी पिणे, झोप येत नाही म्हणून धूम्रपान करणे , झोप येण्यासाठी मद्यप्राशन करणे, झोप लागत नाही म्हणून वाचन करणे, पलंगावर बसून खाणे, पलंगावर, झोपण्याच्या ठिकाणी व्यायाम करणे, झोपण्याच्या वेळी फोन जवळ ठेवणे, झोपायला जाण्याआधी व्यायाम करणे