- अजय परचुरे मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे ४० वीर जवान शहीद झाले. भारताने एअर स्ट्राईक करून या दहशतवादी हल्ल्याचा मुंहतोड जवाब दिला यासाठी प्रत्येक भारतीयाला आपल्या प्रत्येक सैनिकाचा अभिमान वाटतो. देशाच्या सीमेचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करणाऱ्या या बहादूर जवानांना माझा सलाम आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता जॉन अब्राहम याने ‘लोकमत’शी बोलताना दिलीय.पठाणकोट, पुलवामा, उरी या हल्ल्यांकडे तू कसं पाहतोस?पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांचा बदला घ्यावा, अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. तीच माझीही होती. या घटनेचं राजकारण करण्याची गरज नाही. ही कामगिरी भारतीय जवानांनी केली आहे. शौर्याचं कौतुक व्हायलाच हवं. मात्र, सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना लोकांनी संयम बाळगायला हवा. सरकारने सैन्याला दिलेली पूर्ण मोकळीक, जवानांनी उत्तम प्लॅनिंग करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करणं ही अतिशय अभिनंदनीय कामगिरी आहे.एअर स्ट्राईकबद्दल तुला काय वाटतं ?मला आपल्या जवानांच्या अतुलनीय शौर्याबद्दल खूप आदर वाटतो. त्यांच्या साहसाने छाती अभिमानाने भरून येते. मी माझ्या आगामी सिनेमात रॉ एजंटची भूमिका करतोय. ही एका जवानाचीच कहाणी आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकद्वारे केलेला दहशतवाद्यांचा खात्मा भारतीयांचे धैर्य वाढवणारा होता. दहशतवाद्यांचा बदला घेऊन हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली होती. त्यामुळे अभिनेत्यापेक्षा भारतीय म्हणून मला जवानांच्या शौर्याचा जास्त अभिमान आहे. पाकिस्तानने आता तरी त्यांच्याकडे असणाऱ्या दहशतवाद्यांना अटक करून या कारवाया संपवण्याची मोहीम हाती घ्यावी. भारतीय सैनिकांनी आणि सरकारने वेळोवेळी पाकिस्तान सरकारला पुरावे दिलेले आहेत. आता गरज आहे पाकिस्तान सरकारने योग्य कडक कारवाई करण्याची.उरीच्या लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यावर नुकताच चित्रपट आला. आता पुलवामा हल्ल्यावर चित्रपट काढण्यासाठी निर्माते पुढे आले आहेत. कारगिल युद्धावर आधारित तर ‘एलओसी कारगिल’, ‘लक्ष्य’, ‘टँगो चार्ली’, ‘धूप’ आणि ‘स्टम्प्ड’ असे पाच चित्रपट आले. त्याआधी १९७१च्या युद्धावरही भारतात पाच, तर बांग्लादेशातही पाच ते सहा चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र नव्या पिढीला हे युद्ध माहीत नाही. या युद्धाद्वारेच बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यात भारताचा, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मोठा वाटा होता.
प्रत्येक भारतीयाला सैनिकांचा अभिमान वाटतो : जॉन अब्राहम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:37 AM