मुंबई - ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा परिसंवाद आयोजित करण्यात येतात. तसेच, महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठीजन हा मातृभाषेचा गौरव दिन साजरा करतात. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.. असे शब्द लिहित शुभेच्छा देतात. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेहीमराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचा सुपुत्र आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा देव मानण्यात येणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्विट करुन माय मराठीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेची मजा वेगळी आहे. मी लहानाचा मोठा मुंबईतील 'साहित्य सहवास' सोसायटी मध्ये झाल्याने मराठी भाषेचे संस्कार आपोआप होत गेले आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला. मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा! असे ट्विट सचिनने केले आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेत हे ट्विट सचिनने केलं आहे.
दरम्यान, पॉपस्टार रिहानाला उत्तर देणारे ट्विट केल्यानंतर देशभरातून सचिन तेंडुलकवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. सचिनने शेतकरी आंदोलनाविरुद्ध एकप्रकारे सरकारचे समर्थन केल्याचा आरोपही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात झाला. त्यानंतर, आपल्या मातृभाषेतील ट्विट करुन सचिनने जगभरातील मराठीजनांनी मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, मराठी भाषेबद्दल आपली कृतज्ञताही व्यक्त केलीय.