घरोघरी ‘एकटीचा झिम्मा’ असावे, प्रत्येक मराठी माणसानं वाचावे - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 05:56 AM2023-02-20T05:56:36+5:302023-02-20T05:56:53+5:30
दीपा कुलकर्णी लिखित पुस्तकाचे प्रकाशन, हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायला हवे. कारण काही मराठी लोक आजही परदेशात जाण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहतात असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई - ‘एकटीचा झिम्मा’ हे पुस्तक परदेशात कुठे जावे आणि कुठे जाऊ नये, याचे मार्गदर्शन करणारे आहे. परदेशात गेल्यावर तिथे नेमके काय पहायला हवे, याचा नकाशाच जणू ‘एकटीचा झिम्मा’ या पुस्तकात दीपा कुलकर्णी यांनी रेखाटला आहे. परदेशी जाताना आणि विशेषत: युरोप पाहताना हे पुस्तक चाळल्याशिवाय बाहेर पडू नये, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ‘एकटीचा झिम्मा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील मिनी थिएटरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते ‘एकटीचा झिम्मा’ या चित्रकार दीपा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याखेरीज दशमी क्रिएशन्सचे नितीन वैद्य, मंबई ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी, डाॅ. संजय ओक उपस्थित होते. दीपा कुलकर्णी यांनी तीन महिन्यांमध्ये १३ देशांची भ्रमंती करून हे पुस्तक लिहिले आहे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, अतुल कुलकर्णी यांच्या पाठिंब्यामुळे दीपा ८९ दिवस परदेशात राहू शकल्या. हे पुस्तक मी मराठीत लिहायला सांगितले याचा अर्थ इंग्रजीतील मला समजले नाही, असा नाही. हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायला हवे. कारण काही मराठी लोक आजही परदेशात जाण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहतात. दीपा एकट्या परदेशात गेल्याने तिथे जाऊन काय पहायला हवे, कोणत्या गोष्टींचा आनंद लुटायला हवा, हे त्यांनी पुस्तकात लिहिले.
राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष असल्याने किंवा राजकारणी असल्याने त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले नसून, ते कलाप्रेमी आणि भाषाप्रेमी असल्याने ‘एकटीचा झिम्मा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा बहुमान त्यांना देण्यात आल्याची भावना विजय बाविस्कर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला लोकमत औरंगाबादचे संपादक चक्रधर दळवी, लोकमत वृत्तपत्र समूहाचे उपाध्यक्ष (मानव संसाधन) बालाजी मुळे, प्रेसिडेंट (बिझनेस डेव्हलपमेंट) श्रीधर बिजॉय, सिनियर प्रेसिडेंट (ॲडव्हर्टाइज ॲण्ड सेल्स) करूण गेरा, सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट (क्रिएटीव्ह) संजीव नायर, मुंबई युनिटचे उपाध्यक्ष विजय शुक्ला आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आणखी एक पुस्तक लिहावे...
या पुस्तकानंतर कुठे जाऊ नये, हे सांगणारे आणखी एक पुस्तक दीपा यांनी लिहावे, असेही राज ठाकरे म्हणाले. परदेशी लोक त्यांच्याकडे नसलेलेसुद्धा विकतात, पण आमच्याकडे असूनही आम्हाला ते विकता येत नाही. त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टी आपण खर्च करून बघायला जातो. दीपा नियोजन न करता परदेशात गेल्या. जगात इम्पाॅसिबल असे काही नाही. इतर देशांमध्ये सर्व गोष्टी सहज शक्य होतात मग आपल्याकडे का होत नाहीत? हा इच्छेचा विषय आहे. आपल्याकडे मात्र नियोजन न करता कामे होतात. त्यामुळे सर्व बट्ट्याबोळ झाला आहे.