- यदु जोशी मुंबई - भाजपचे उमेदवार निवडणूक प्रचार यंत्रणा कशी राबवत आहेत, ते कुठे कमी पडत आहेत आणि त्यांनी अधिक काय करायला हवे याचे रिपोर्ट कार्ड दररोज रात्री ११ वाजता त्यांना दिले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी राज्यातील पक्षाच्या सर्व २४ उमेदवारांची झूम मीटिंग घेतली तेव्हा ही माहिती दिली. तुमच्या प्रचाराची पद्धत कशी असावी, कोणत्या गोष्टींवर फोकस असला पाहिजे हे दरदिवशी तुम्हाला सांगितले जाईल, त्यानुसार यंत्रणा राबवा, असेही बावनकुळे म्हणाले.
मोदींचा फोटो मोठा, उमेदवाराचा लहानप्रचाराच्या कोणत्याही पोस्टरवर, पॅम्फ्लेटवर वा अन्यत्र कुठेही पंतप्रधान मोदी यांचा फोटो मोठा राहील, त्यापेक्षा जरा लहान फोटो हा कमळ चिन्हाचा असेल आणि त्यानंतर कमळापेक्षा लहान फोटो उमेदवाराचा असेल असा क्रम बावनकुळे यांनी ठरवून दिला. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या राज्यात १२ ते १५ सभा होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
रिपोर्ट कार्डमध्ये काय असेल? - मतदारसंघातील प्रचार यंत्रणेचा समन्वय भाजपची केंद्रीय यंत्रणा आणि प्रदेश कार्यालयातील यंत्रणेशी सातत्याने राहील. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे, प्रचारात कुठे चुका होत आहेत, त्या कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या, उमेदवाराबद्दलचे जनमानस कसे आहे याचा फीडबॅक दरदिवशी उमेदवारांना दिला जाईल. एकूणच प्रचार यंत्रणेसंदर्भातील रिपोर्ट कार्ड दररोज हाती पडेल, असे बावनकुळे म्हणाले. - प्रचाराचे नेमके स्वरूप कसे असले पाहिजे यासंबंधी सर्व उमेदवारांसाठी एक ‘एसओपी’ (स्वीकृत कार्यप्रणाली) सर्वांना पाठवून द्या अशी सूचना विदर्भातील एका उमेदवाराने केली. ती बावनकुळे यांनी मान्य केली. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली अनेक विकासाभिमुख कामे आणि घेतलेले निर्णय यावरच फोकस ठेवा आणि बूथकेंद्रित प्रचारयंत्रणा राबवा अशी सूचनाही त्यांनी केली.