Join us

प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करा आणि...; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 8:38 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

Aditya Thackeray ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कठोर निर्णय घेत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांना कायम ठेवावं यासाठीची विनंती राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र आयोगाने ही विनंती अमान्य करत सदर अधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

"निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मिंधे सरकार गप्पच राहिले. अखेर निवडणूक आयोगाने आज मुंबईच्या आयुक्तांना हटवले. उशीरच झाला, पण निदान योग्य निर्णय झाला. तरीही मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी केली जावी आणि जनतेच्या कराच्या पै अन् पैचा हिशेब केला जावा," अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला सत्ताधारी गोटातून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निवडणूक आयोगाने का दिले निर्देश?

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह पालिकेच्या अतिरक्त आयुक्त आणि उपायुक्तांची तात्काळ बदली करावी, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य सरकारनं चहल आणि भिडे यांना या नियमातून वगळावं अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगानं राज्य सरकारनं केलेली मागणी फेटाळत त्यांच्या तात्काळ बदलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता इक्बाल सिंह चहल आणि अश्विनी भिडे यांची बदली होणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिकाभारतीय निवडणूक आयोग