मुंबई : विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांना तज्ज्ञांकडून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सल्ला मिळावा, यासाठी टेलिमेडिसीन केंद्रे सुरू करण्यात आली. २००७ साली केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आलेले टेलिमेडिसीन केंद्रा मुंबईसह राज्यभरातील रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मागील तीन वर्षांपासून दरवर्षी ६ हजार रुग्ण या केंद्रात उपचार घेत आहेत.दुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, सल्ला मिळण्यासाठी टेलिमेडिसीन सेवा उपलब्ध करून देण्यात येते. या माध्यमातून रुग्णांशी थेट संपर्क साधण्यासह, एक्स-रे, एमआरआय, ईसीजी, टूडी-इको यांसारख्या रिपोर्ट्सची स्क्रीनवर पाहणी करता येते. कार्डिओलॉजिस्ट, कान-नाक-घसा विशेषज्ञ, अस्थिव्यंग विशेषज्ञ, आॅन्को सर्जन, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ व्ही-सॅट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण रुग्णांना सल्ला देतात.अपघातातील गंभीर जखमांपासून ते अनेक प्रकारच्या जटिल शस्त्रक्रियांपर्यंत अनेक रुग्ण टेलिमेडिसीनच्या माध्यमातून उपचार घेतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘टेलिमेडिसीन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या प्रमुख केईएम रुग्णालयाच्या डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली. यात डोळ्यांचे आजार, बोटांचा संसर्ग, त्वचेचा संसर्ग असे अनेक प्रकारचे सल्ले आणि उपचार डॉक्टर रुग्ण जिथे आहे, तिथे देता येऊ शकतात. त्यामुळे मोठ्या रुग्णालयात रुग्णांना सल्ल्यासाठी दूरहून यायची गरज भासतनाही.‘लाइव्ह’ तपासणीव्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून केवळ रुग्णाचे वैद्यकीय रिपोर्ट न पाहता, ग्रामीण भागातील रुग्णांच्या हृदयाचे ठोके केईएम रुग्णालयातील बसलेल्या डॉक्टरला ऐकता येऊ शकतात, तसेच या तंत्रज्ञानाने रुग्णाचा ईसीजी काढून उपचाराचीही सोय केली जाते. ही तपासणी आॅनलाइन लाइव्ह असल्याने भौगोलिक मर्यादांचे बंधन आरोग्य तपासणीला नसते.एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावर केईएम रुग्णालयाला पाचवे स्थान मिळाले आहे. शासकीय रुग्णालयांच्या विभागात दर्जेदार सेवा आणि उत्तम सुविधा देणाऱ्या रुग्णालयांना सन्मानित करण्यात येते. गेल्यावर्षीही केईएम रुग्णालयाने या यादीत पाचवे स्थान मिळविले होते. यंदाही ते स्थान टिकवून ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे.मागील तीन वर्षांत टेलिमेडिसीन पद्धतीद्वारे उपचार घेणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या केंद्रात सर्वाधिक रुग्ण कोकणातून येतात. त्यानंतर, खान्देश-विदर्भाचा क्रमांक लागतो. या केंद्रात २ वर्षांपासून ते थेट ५९ वयोगटांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे. दरदिवशी किमान ५० रुग्णांवर या केंद्राच्या माध्यमातून उपचार केले जातात. गेल्या काही वर्षांत या सेवेविषयीची जनजागृती वाढल्याने प्रतिसादही वाढतोय.- डॉ. कामाक्षी भाटे, प्रकल्प प्रमुख, केईएम .
दरवर्षी ६ हजार रुग्णांवर होतात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपचार; केईएम रुग्णालयाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:26 AM