दरवर्षी १०० प्राचीन वस्तूंची पडते भर
By admin | Published: May 18, 2017 03:32 AM2017-05-18T03:32:49+5:302017-05-18T03:32:49+5:30
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या विस्तारात ‘अॅप्लिकेशन’पासून सगळेच अपडेट होताना दिसते, मग त्यात संग्रहालय मागे कसे राहील. दरवर्षी देश-विदेशांतून जवळपास
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या विस्तारात ‘अॅप्लिकेशन’पासून सगळेच अपडेट होताना दिसते, मग त्यात संग्रहालय मागे कसे राहील. दरवर्षी देश-विदेशांतून जवळपास १०० दुर्मीळ आणि प्राचीन वस्तूंची भर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पडते. त्यामुळे हा संग्रह उत्तरोत्तर वाढत संग्रहालयाच्या खजिन्याची शान वाढवित असतो. हा नव्याने संग्रहालयात येणाऱ्या खजिन्याचा आस्वाद घेण्याची संधीही कलारसिकांना मिळते, हेसुद्धा संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे.
कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जगभरातून नव्या वस्तू आणल्या जातात. या प्रक्रियेत बऱ्याचदा काही कलाकृती संग्रहालयाला भेट स्वरूपात येतात किंवा मग एखादी दुर्मीळ संग्रहालयाच्या संग्रहात महत्त्वाची असणारी कलाकृती संग्रहालय खरेदी करते, अशी माहिती वस्तुसंग्रहालयाच्या वरिष्ठ क्युरेटर डॉ. मनीषा नेने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्या म्हणाल्या की, दरवर्षी अशा नव्याने संग्रहालयात आलेल्या कलाकृतींचे संवर्धन आणि जतन करून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते.
जेणेकरून, या कलाकृती पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. सध्या संग्रहालयाच्या संग्रहात विविध कला शाखांतील ६० हजारांहून अधिक कलाकृती आहेत. संग्रहात नव्याने आलेल्या १९३३ च्या काळातील जहांगीर सबावाला यांची सहा चित्रे, एक हेबर यांचे चित्र, रतन टाटा यांचे १९२२ या काळातील संग्रह, राणी चिमणाबाई साहेब गायकवाड यांच्या साड्या, होमी भाभा यांच्या माता मेहेरन भाभा यांच्या साड्या, फिरोजा गोदरेज आणि पॉलिन रोहतगी यांच्या चित्रकृती महत्त्वपूर्ण आहेत. याशिवाय, व्यक्तिगत संग्रहात अनिता गरवारे, देवांग देसाई, रेखा नेल यांनी दुर्मीळ कलाकृती संग्रहालयाला भेट म्हणून दिल्या आहेत. या सर्व कलाकृती अत्यंत दुर्मीळ असून तेराव्या शतकापासून ते विसाव्या शतकातील आहेत.
- १८ मे या दिवशी वर्ल्ड म्युझियम डे साजरा केला जातो. इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ म्युझियम्स ही संघटना या दिवसाचे आयोजन करते. या दिवसामुळे वस्तुसंग्रहालयांसमोर असणारे प्रश्न, तसेच आव्हानांचा विचार करण्याची संधी मिळते.
दरवर्षी नव्या संकल्पनेवरती विचार करून हा दिवस साजरा केला जातो. २०१७ साठी म्युझियम्स अॅण्ड कंटेस्टेड हिस्टरिज, सेइंग अनस्पिकेबल इन म्युझियम्स ही संकल्पना निवडण्यात आली आहे.