मतदारांच्या संपर्कासाठी सर्वांचेच जोरदार प्रयत्न
By admin | Published: June 10, 2015 10:57 PM2015-06-10T22:57:32+5:302015-06-10T22:57:32+5:30
येथील राजकीय पक्षांनी आता पत्रकारपरिषदा आयोजित करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या माध्यमातून मतदारांना माहिती मिळावी,
दीपक मोहिते, वसई
येथील राजकीय पक्षांनी आता पत्रकारपरिषदा आयोजित करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या माध्यमातून मतदारांना माहिती मिळावी, असा उद्देश आहे. बुधवारी दिवसभरात तीन प्रमुख राजकीय पक्षांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये
बविआ, शिवसेना व काँग्रेस यांचा समावेश होता.
सेनेच्या पत्रकार परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई व सायंकाळी झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेसाठी प्रदेश अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. तर बहुजन विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेसाठी महापौर नारायण मानकर व माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते.
प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना गाठायचेच असे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन राजकीय नेते वेगवेगळ्या क्लृप्त्या योजत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांने विजयाचा दावा केला आहे. बविआ व शिवसेना हे दोन पक्ष वगळता इतर एकाही पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ जागा लढवता आल्या नाहीत. बविआने सर्वच्या सर्व ११५ जागांवर उमेदवार उभे केले. तर, सेना भाजपशी युती करून ७५ जागा लढवत आहे. त्या पाठोपाठ भाजपच्या वाट्याला ४० जागा आल्या असल्या तरी, त्यांना तेवढ्या जागा लढवणे तिला शक्य झाले नाही. काँग्रेसने ३७ जागेवर उमेदवार उभे केले आहे. तर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला केवळ १२ जागांवर उमेदवार मिळू शकले. ही स्थिती लक्षात घेता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे सत्तास्पर्धेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. सेना ७५ जागा लढवित असून बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा ती गाठू शकते काय या कडे सगळ्यांचे लक्ष आहे. बुधवारी एका वृत्तवाहीनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सेना, भाजप व काँग्रेसचे प्रतिनिधी व बविआचे आमदार क्षितीज ठाकूर हे सहभागी झाले होते. अनधिकृत बांधकामे, सिडको, पाणी, व अन्य नागरीसुविधांच्या प्रश्नावर त्यांनी बविआला घेरण्याचा प्रयत्न केला तर आमदार ठाकूर यांनी आघाडीचा बचाव केला.
प्रचार संपायला केवळ ४८ तासाचा अवधी असल्यामुळे आता खरा रणसंग्राम सुरू झाला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. १३ जूनची रात्र ही कसोटीची असून प्रत्येक राजकीय पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी डोळ्यात तेल घालून मतदारसंघावर लक्ष ठेवणार आहेत. विशेष करून झोपडपट्टीचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये रात्रीच्यावेळी हेराफेरी होऊ नये, म्हणून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. मागील दहा दिवस झालेला प्रचार हा शांततेत झाला परंतु येत्या ४८ तासात होणाऱ्या प्रचारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक व पोलीस यंत्रणा सतर्क आहेत. जागोजागी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१४ जून रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. १३ तारखेच्या दुपारपासूनच कर्मचारीवर्ग व साहित्य प्रभागात पाठवण्यास सुरूवात होणार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. जे कर्मचारी निवडणुकांच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
या वेळीच्या लढती बहुरंगी असल्यामुळे मतदारराजा कोणाच्या बाजुने कौल देतो याकडे सगळ्या जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.