BIG BREAKING: १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवास करता येणार, पण ठरावीक वेळेतच; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
By कुणाल गवाणकर | Published: January 29, 2021 01:01 PM2021-01-29T13:01:59+5:302021-01-29T13:19:08+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; सामान्यांना करता येणार लोकल प्रवास
मुंबई: कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरू होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.
कधी प्रवास करता येईल:सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.
कधी प्रवास करता येणार नाही: म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढला; अनलॉक अंतर्गत देण्यात आलेली सूट कायम
सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंतीदेखील मुख्य सचिव यांच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आली आहे.
उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.