शोध प्रत्येकातल्या ‘चार्ली’चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:44 AM2017-12-25T01:44:50+5:302017-12-25T05:46:30+5:30

मिशांची वेगळी स्टाइल, बॉलर हॅट, हातातील लहानशी छडी आणि चालण्याचा एक निराळा अंदाज, यामुळे चार्ली चॅप्लिनने विनोदाच्या जगात आपली एक वेगळीच छाप उमटवली.

Everyone in Charlie's search | शोध प्रत्येकातल्या ‘चार्ली’चा !

शोध प्रत्येकातल्या ‘चार्ली’चा !

Next

स्नेहा मोरे
मुंबई : मिशांची वेगळी स्टाइल, बॉलर हॅट, हातातील लहानशी छडी आणि चालण्याचा एक निराळा अंदाज, यामुळे चार्ली चॅप्लिनने विनोदाच्या जगात आपली एक वेगळीच छाप उमटवली. ज्याने मूक राहूनही आपल्या अप्रतिम हास्यअभिनयाने लोकांना इतके हसवले की जगातील कोणतीही विनोदी मालिका पाहिल्यावर त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जगाला भरभरून हसायला लावणारा हा कलाकार २५ डिसेंबर १९७७ रोजी हे जग सोडून गेला. मात्र आजही मुंबईतील राजन कुमार हा उमदा कलाकार चार्लीच्या वेशात जाऊन प्रत्येकाच्या मनातील ‘चार्ली’चा शोध अविरतपणे घेतो आहे.
बिहारमधील मुंगेर या छोट्याशा गावात राजन कुमार याचा जन्म ५ जानेवारी १९७९ रोजी झाला. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाºया राजन यांनी तरुण वयात नॅशनल स्कूल ड्रामामध्ये शिक्षण घेतले. १७ वर्षे चार्ली चॅप्लिनचे पात्र जगणाºया या अवलियाला या प्रवासाविषयी विचारले असता तो सांगतो की, एका मित्राने नव्या पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनावेळी मायकल जॅक्सनचे पात्र होऊन अभिनय-नृत्य कराल का, अशी विचारणा केली. त्या वेळी होकारही दर्शविला, मात्र जॅक्सनऐवजी चार्लीचे पात्र लोकांना अधिक हसवेल, अशी कल्पना सुचली. मग २००० सालापासून सुरू झालेला प्रवास अजूनही थांबलेला नाही; धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनातील चार्ली चॅप्लिन शोधण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत हे पात्र जगण्याची इच्छा आहे.
चार्ली यांची एक ओळख अशी होती की, लोक फक्त त्यांच्यावर हसत नसत, तर त्यांच्या चालण्या, बोलण्यावर, धावण्यावर, पडण्यावर आणि इतकेच काय तर त्यांच्या रडण्यावरही दिलखुलासपणे हसत असत. जगात असे फारच कमी कलाकार झाले, ज्यांनी स्वत:च्या चेहºयावर दु:ख आणून जगाला मोकळेपणाने हसवले, त्यापैकीच चार्ली एक होते. राजन याने गेली दोन वर्षे चार्ली यांच्या आयुष्यातील सर्व बारकाव्यांचा अभ्यास केला. अगदी कसलाही अभिनय न करता किंवा एकही वाक्य न बोलता जरी ते समोर दिसले तरी लोकांना हसू आवरत नसे, हसण्याचे हेच नेमके रहस्य प्रत्येक नव्या शोमध्ये करत असतो, असे राजन आवर्जून सांगतो.

जगभरात ‘चार्ली चॅप्लिन २’ अशी राजन याची ख्याती आहे. आजपर्यंत त्याने स्वत: १५ कलाकारांना चार्ली चॅप्लिनच्या अभिनयाचे प्रशिक्षण दिले असून तेसुद्धा एकपात्री अभिनयाचे शो देशाच्या कानाकोपºयात करीत आहेत. गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये ‘चार्ली लव्हर्स पॉइंट’ उभारण्याचा राजन याचा मानस असून त्यासाठी शासनाच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच, नव्या पिढीला चार्ली चॅप्लिनची ओळख व्हावी, त्यांच्यापर्यंत हे अजरामर पात्र पोहोचावे यासाठी चार्लीच्या आयुष्यावर कलर फिचर फिल्मही बनविणार असल्याचे राजन सांगतो.
 

Web Title: Everyone in Charlie's search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.