खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 01:16 PM2022-09-21T13:16:15+5:302022-09-21T13:17:30+5:30

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी अनुराग सिंह ठाकूर यांच्या ताज्या दौऱ्याविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत!

Everyone knows who the real Shiv Sena; Central Minister Anurag Thakur clearly said! | खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले!

खरी शिवसेना कोणती हे सगळ्यांना माहिती आहे; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितले!

Next

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी अनुराग सिंह ठाकूर यांच्या ताज्या दौऱ्याविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत!   

आपण महाराष्ट्रात कोठे कोठे गेला होतात? 

मला कल्याण आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी मी दौरा केला तो मतदारसंघ आणि लोकांना समजून घेण्यासाठी! यावेळी मी तिथले राजकारण आणि लोकांच्या गरजा जवळून पाहिल्या, समजून घेतल्या. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मला या भागात पुन्हा जायचे आहे. त्यावेळी मी आणखी माहिती घेईन.

यावेळी आपल्याला काय आढळले? 

महाआघाडी सरकारने केवळ स्वतःसाठी पैसे जमवण्याकडे लक्ष दिले. विकास कामांकडे त्यांचे प्रचंड दुर्लक्ष झाले. मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते. कनिष्ठ स्तरावरचे नेते आणि अधिकारीही तसेच वागत होते. न जाणो जनतेचे कल्याण होईल, या भीतीने राज्याने केंद्र सरकारच्या योजना लागू केल्या गेल्या नाहीत. केंद्रीय योजनांमध्ये राज्य सरकारच्या वाट्याचा निधी अडवून ठेवला. ज्या पैशातून जनहिताच्या योजना राबवल्या जाणार होत्या, सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी ते पैसे आपल्या खिशात टाकले. प्रत्येक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

केंद्रीय योजनांबाबत कोणत्या गोष्टी तुम्हाला आढळल्या? 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मिळाले का?- या प्रश्नाला बहुतेक लोकांनी नकार दिला. याचा अर्थ उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात एकतर घरे बांधली गेलीच नाहीत आणि जी बांधली गेली ती लोकांच्या हवाली न करता कुलूप लावून ठेवली गेली. बृहन्मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचे सांगणे होते की ‘मुंबईत जागा कमी असल्याने प्रत्येक घरात शौचालय देणे शक्य नाही.’ मी म्हटले की ‘कमीत कमी सामुदायिक शौचालय तर बांधून दिले असते.’ तर उत्तर मिळाले की ‘पुढच्या दोन वर्षात मुंबईत सर्व ठिकाणी सार्वजनिक शौचालये तयार करून दिली जातील’!  याचा अर्थ संपूर्ण देशात जे काम या आधीच झाले आहे, ते उद्दिष्ट गाठायला मुंबईला अजून काही काळ घालवावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांचे काम न करणे आणि कामातील अकुशलता यामुळे ही वेळ आली अशी लोकांची समजूत आहे. मुंबईत आजही बाबा आदमच्या काळातील सिटी बसेस चालतात. जेएनएनआरयूएम या केंद्र सरकारच्या योजनेमार्फत नव्या बसेस पाठवल्या गेल्या. परंतु त्यांचे सुटे भाग काढून जुन्या बसेसना लावण्यात आले. नव्या बसेस भंगार झाल्या. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजने अंतर्गत जी कामे करायचे ठरले होते. त्यातले एकही पूर्ण होऊ शकलेले नाही.काही तर सुरूही झालेली नाहीत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.  

आपला मुंबई दौरा ‘मिशन १४४’ चा भाग होता काय? काय आहे हे मिशन ?

खरे तर मागच्या निवडणुकीत आमचा पक्ष किंवा सहकारी पक्ष ज्या जागा जिंकू शकले नाहीत, त्या  जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे भाजपने ठरवले आहे. यावेळी आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यात मुंबई आणि कल्याणमधल्या जागाही आहेत. आमचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रमाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवीत आहोत. त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.

आपले गठबंधन यावेळी किती जागा जिंकेल? 

महाराष्ट्रातल्या ४५ लोकसभा जागांमधल्या सर्वच्या सर्व ४५ जागा आम्ही जिंकू, असा विश्वास आहे.  काम आणि विश्वासार्हता हे आमचे वैशिष्ट्य आहे. पहिल्यापेक्षा जास्त लोकांचा आज मोदी यांच्या क्षमतेवर, विश्वसनीयतेवर भरवसा आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मिळून सरकार स्थापन झाले आहे. अशावेळी अनेक जागा सहयोगी पक्षांकडे आहेत. आपण आपल्या सहयोगी पक्षांविरुद्ध प्रचार कराल काय? 

आम्ही एक दुसऱ्यांच्या विरुद्ध नव्हे तर एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुका लढू. भाजपाचा कार्यकर्ता प्रत्यक्षात जितका जास्त सक्रिय होईल तितके आमचे गठबंधन मजबूत होत जाईल.

खरी शिवसेना कोणती हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात अडकून पडले आहे. त्या निर्णयाचा आपल्या गठबंधन सरकारवर काही परिणाम होईल काय? 

अजिबात नाही. खरी शिवसेना कोणती ते सर्व लोक जाणतात. जे लोक सरकारमध्ये असताना लोकांना आपल्या घरी येऊ देत नव्हते त्यांच्याबद्दल लोकांचे मत आता प्रकट होऊ लागलेले आहे. तसे तर आज शिवसेनेचे जास्तीत जास्त खासदार आणि आमदारच नव्हे; तर शिवसेनेच्या जिल्हा शाखासुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आहेत!

Web Title: Everyone knows who the real Shiv Sena; Central Minister Anurag Thakur clearly said!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.