Join us

सबका साथ, सबका विकास हवा, पण तो मुळावर येणारा नको- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 6:22 AM

मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई वातावरण कृती आराखडा’ अहवालाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मुंबई :  सबका साथ, सबका विकास म्हणतो. पण, तो मुळावर येणारा नको. विकास शाश्वत हवा, पर्यावरणाची हानी न करता दीर्घकाळ टीकणारा हवा. वातावरण कृती आराखडा तयार करणारे मुंबई हे पहिले शहर ठरले आहे. आता, देशाने याचे अनुकरण करायला हवे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. तसेच, कर्तव्य म्हणून आरेचे जंगल वाचविले. सुविधाही देणार, पण राज्याच्या हितासाठी जे आवश्यक ते मुख्यमंत्री म्हणून करणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई वातावरण कृती आराखडा’ अहवालाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहातील या कार्यक्रमास मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. अरविंद सावंत, मुंबई महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधा उभारताना त्या पर्यावरणस्नेही हव्यात.

काही वर्षांपूर्वी उत्तरेत धरणच वाहून गेले. त्यामुळे विकास करताना काय गमावतो, याचा विचार व्हायला हवा. वातावरण बदलाची फक्त चर्चा होते, करत काही नाही. हाच धागा पकडत मुंबई महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. पर्यावरणीय बदल आणि त्याचे दुष्परिणाम थोपविण्यासाठी कृती करणारे मुंबई हे पहिले शहर बनले आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी. पण, या शहराच्या सुविधांवर येणारा ताण पाहता ते वरदान की शाप, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तर, वातावरण बदलांना थोपविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन २०२१च्या ऑगस्टमध्ये दिले होते. आता अंमलबजावणीसाठी हा आराखडा आपल्या समोर आला आहे. आपले आणि या पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने या आराखड्यातून पुढचे पाऊल टाकल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेपर्यावरण