Join us

देशाचे पुन्हा तुकडे करण्याचा घाट रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे : सिकंदर रिझवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:07 AM

मुंबई : भारतात वहाबी विचारांच्या लोकांना येऊन सुमारे दीडशे वर्षे झाली. १९५० नंतर भारतात वहाबी विचारांचे मूळ धरू लागले. ...

मुंबई : भारतात वहाबी विचारांच्या लोकांना येऊन सुमारे दीडशे वर्षे झाली. १९५० नंतर भारतात वहाबी विचारांचे मूळ धरू लागले. काँग्रेसने त्यांना परवानगीही दिली होती. त्यामुळेच सारंगपूर येथे देवबंद सेमीनरी आणि लखनऊ नदवा येथे दुसरे केंद्र तयार केले गेले. आता वहाबीवादी बंगालमध्ये मुगलीस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या अनेक छोट्या भागांमध्ये असे प्रकार होत आहेत. म्हणूनच देशाचे पुन्हा तुकडे करण्याचा घाट रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. यासाठी सरकारचीही इच्छाशक्ती हवी. तसेच अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या मदरशांना बंद करायला हवेत. आणि त्यावर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, असे मत हिंदू राष्ट्र शक्ती संघटनेचे संस्थापक कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी व्यक्त केले.

सावरकर स्मारकाने गुरुवारी आयोजित केलेल्या वीर सावरकर कालापानीमुक्ती शताब्दी ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. वीर सावरकर का हिंदुत्व और निधर्मिता या विषयावर ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, भारतातील मुस्लीम आपल्या रीतिरिवाजांमध्ये हिंदुत्वाला स्वीकारत आहेत. ते त्यापासून दूर होऊन त्यांनी स्वतःचे अस्तित्व राखावे यासाठी वहाबीवाद्यांचा आटापिटा सुरू झाला. याला सौदीमधून पाठिंबा मिळत होता. मदरशांमधून तालिबानी पद्धतीने दिले जाणारे शिक्षण लक्षात घेता हे मदरसे बंद करायला हवेत. तेथे लहान मुलांच्या मनात विष पेरले जाते.

भारतीय मुस्लीम विद्रोही नाहीत, पण विरोध करता करता ते विद्रोही झाले आहेत. त्यांना चांगले शिक्षण न मिळाल्याने असे झाले आहे.

मुस्लिमांची लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे अल्पसंख्याक म्हणून त्यांना मिळणाऱ्या सुविधा बंद करायला हव्यात. देशस्तरावर लोकसंख्येचा विचार करून त्यांचा अल्पसंख्याक म्हणून विचार केला जाऊ नये, तर राज्यनिहाय लोकसंख्या विचारात घेऊन विविध राज्यांमध्ये असलेल्या अन्य अल्पसंख्याक समाजाला सुविधा मिळायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

उर्दूबद्दल ते म्हणाले की, पाकिस्तानने उर्दू ही आपली व मुसलमानांची भाषा असल्याचा अपप्रचार केला. मात्र उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतात निर्माण झालेली भाषा आहे. त्यात संस्कृत, हिंदी, फारसी शब्दही आहेत.