प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे
By Admin | Published: March 27, 2015 12:03 AM2015-03-27T00:03:38+5:302015-03-27T00:03:38+5:30
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे.
मुंबई: ‘प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. मृत्यूनंतर प्रेत जाळण्यासाठी लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होते, त्यापेक्षा अवयवदान केल्यास समाजालाही त्याचा उपयोग होतो. म्हणूनच प्रत्येकाने अवयवदान करणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी केले. ‘महाराष्ट्र अवयव दिन’च्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अवयव दानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एका खाजगी हॉस्पिटलतर्फे ‘लिव्ह लाइफ अॅण्ड पास इट आॅन’ मोहिम राबविली जात आहे. यानिमित्त कुर्ला येथील कार्यक्रमात अभिनेते रमेश देव यांनी डोळे व त्वचा दान करण्याची शपथ घेतली.
‘महाभारतातील दु:शासन, भीम, युधिष्ठिर कोणाला लक्षात नाहीत, मात्र दानवीर कर्ण सर्वांच्याच लक्षात आहे. कर्णाने केलेल्या दानामुळेच तो शतकानुशतके सर्वांच्या मनात आहे. तसेच आपणही डोळे, त्वचा, यकृत, मूत्रपिंड यासारखे अवयवदान केलेत तर मृत्यूनंतरही तुम्ही जिवंत रहाल’, अशी भावना देव यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी प्रतिक म्हणून काही दात्यांनी हातात दिवे घेतले होते. ज्या लोकांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना आॅरगन डोनर (अवयवदाता) कार्ड देण्यात आले. तसेच डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी मिळून ‘अवयवदान’ विषयावर पथनाट्य सादर केले. याद्वारे अवयवदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात आले. ‘कॅडेव्हर रोपणाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. यासाठी अनेक सामाजिक संस्था, सरकारी संस्था तसेच खासगी संस्थांनीही या विषयावर जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे’, असे डॉ. राजीव बोधनकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
च्अवयव दानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एका खाजगी हॉस्पिटलतर्फे ‘लिव्ह लाइफ अॅण्ड पास इट आॅन’ मोहिम राबविली जात आहे.