मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री यांना ईडीकडून आलेल्या नोटिसीनंतर ‘सगळ्यांचे दिवस येतात. दिल्लीत आमचेही दिवस येतील’, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
सुडाची भावना आणि बिनबुडाच्या राजकारणातून हे सगळे प्रकार सुरू आहेत. ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली, हा मुख्यमंत्र्यांना धक्का वगैरे काही नाही. अनिल परबच काय अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्याजवळचा आहे. त्यामुळे कितीही नोटिसा पाठवा. आम्ही घाबरणारे आणि डगमगणारे नाही, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांवर काही दिवसांपासून कारवाया सुरूच आहेत.
आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ईडीचे लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही. अनिल परब कायदा क्षेत्रातले जाणकार असल्याने काय करायचे हे, त्यांना माहीत आहे. कर नाही त्याला डर कशाला, असे सांगतानाच काहीही असले तरी चौकशीला सामोरे जाऊ, असेही राऊत म्हणाले.
ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, अनिल परब यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली. दहा मिनिटांच्या या भेटीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.