मुंबई : आपल्या रागावर आपण नियंत्रण कसे ठेवतो, ताणतणावाचे व्यवस्थापन आपण करतो का, अप्रिय व्यक्तीने दिलेला त्रास, दुःखदायक प्रसंग यांना आपण विसरू शकतो का, अशा बाबींवर प्रत्येकाचे मानसिक आरोग्य अवलंबून असते. विचार, भावना व वर्तन याची कोणतीही एक बाजू कमी, अधिक झाले की, मानसिक संतुलन बिघडते. मानसिक त्रास सुरू होतो आणि त्याचे हळूहळू मनोविकारात रूपांतर होत जाते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांनी नमूद केले. ‘मन के साथ मन की बात’, या विषयांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नुकत्याच आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘मन उधाण वाऱ्याचे’ या विषयावरील पुष्प मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांनी गुंफले. यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, मनोविकार हे क्षेत्र समाजात नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहे. सुदृढ शारीरिक आरोग्यासाठी मानसिक आरोग्यही निरोगी हवे. मानसिक विकार उद्भवण्याची कारणे जशी जैविक, मानसिक असतात तशीच ती सामाजिक म्हणजेच, नैसर्गिक आणि मानवनिर्मितही असतात. मनोविकार कुणालाही होऊ शकतो; पण वेळीच निदान, उपचार होणे आवश्यक असते. असे घडले तर रुग्ण नक्कीच बरा होऊ शकतो. शारीरिक आजार लगेच दिसून येतात; पण मानसिक आजार हे अदृश्य असतात.
सौम्य मानसिक आजार सहसा कळत नाहीत; पण औषधाने, चर्चेने आधाराने रुग्ण बरे होतात. यामध्ये बहुतेक वेळा रुग्ण हे अंधश्रद्धेकडेही झुकतात. वास्तुशास्त्र, फलज्योतिष ग्रह फिरणे, व्यसन या वाईट गोष्टींना, अंधश्रद्धायुक्त बाबींना बळी पडण्याचा धोका निर्माण होतो. स्किझोफ्रेनिया हा तीव्र मानसिक आजार शक्यतो १८ ते १९ या वयोगटातील अनेकांना सुरू होतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल सवाखंडे, वक्ता परिचय व स्वागत नीलेश कुडाळकर, प्रश्नांचे वाचन सुधाकर काशीद, सूत्रसंचालन धर्मराज चवरे, आभारप्रदर्शन अजय भालकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव बावगे, नंदकिशोर तळाशीलकर, गजेंद्र सुरकार, नितीन कुमार राऊत, विनायक सावळे, अवधूत कांबळे, अनिल करवीर, सचिन थिटे, कीर्तिवर्धन तायडे यांनी परिश्रम घेतले.