Join us

डीएनए चाचणीनंतरच मिळेल बलात्काराचा पुरावा; ठोस माहिती मिळत नसल्याने तपासाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:03 AM

त्या अनुषंगाने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चर्नीरोड येथील सावित्रीदेवी फुले वसतिगृहातील तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराबाबत ठोस माहिती न आल्याने डीएनए चाचणीचा पुरावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे. 

याप्रकरणात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी आतापर्यंत १० ते १२ जणांचे जबाब नोंदवले आहेत. गुरुवारी सायंकाळी तरुणीच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी त्या दिवशी वसतिगृहात आलेल्या सर्व तरुणीसह तेथे असलेल्या प्रत्येकाचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी ओमप्रकाश कानोजियाने तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. तरुणीच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याप्रकरणात डीएनए चाचणीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. हा पुरावा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. घटनास्थळी मिळालेल्या एकंदरीत पुराव्यावरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट होत आहे.  डीएनए चाचणीचा अहवालानुसार पोलिस पुढील कारवाई करतील. 

आरोपीचे वडील आणि रेल्वे रुळावर सापडलेल्या कानोजियाच्या मृतदेहाबाबत तरुणीच्या वडिलांनी आक्षेप घेतला होता. तो मृतदेह त्याचाच आहे की नाही, याबाबत संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सीसीटीव्ही, सीडीआर ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसेच महत्त्वपूर्ण पुरावे ताब्यात घेतले आहेत. तरुणीचा सीडीआरदेखील काढण्यात आला असून, त्यानुसार तपास सुरू आहे.

 

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारी