Join us

'ईव्हीएम, वंचित आघाडीमुळे नाही; तर बुथप्रमुखांमुळे जिंकलो'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:46 AM

चंद्रकांत पाटील; संघटनेच्या गुणात्मक वाढीवर देणार भर

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना युतीचा विजय हा ईव्हीएम किंवा वंचित आघाडीमुळे झाला नाही. बुथप्रमुख, पन्नाप्रमुखांचे सशक्त संघटन आणि पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकास कामांमुळे हा विजय मिळाला आहे. त्याच जोरावर आगामी विधानसभाही जिंकू असा विश्वास व्यक्त करतानाच ईव्हीएममुळे विजय झाला असेल, तर बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे कशा जिंकल्या, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात पक्षाच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत पाटील बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुका युती म्हणून लढल्या जाणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, वातावरण चांगले आहे, स्वबळावर जिंकता येईल असे भाजपमधील अनेक जण म्हणत आहेत, पण मागील निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढली होती. आता आघाडीतील पक्षांनी तसा निर्णय घेतल्यास त्यांना वीस जागासुद्धा मिळणार नाहीत. शिवसेना आणि भाजपची युती एका विचारांसाठीची आहे. त्यामुळे युती होईल का, मुख्यमंत्री कोण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर सोपवा. आगामी निवडणुकीत महायुतीचे किमान २२० जागा जिंकल्याच पाहिजेत, ही आपली जिद्द आहे. जिथे भाजप उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजप निवडणूक लढणार आहे हे जाणून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याची सुचना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता, अमित भाई शहा यांनी बळकट केलेले पक्ष संघटन, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी कामगिरी हे सर्व आपल्याकडे आहे. ७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही, ते मोदी आणि फडणवीस यांनी करून दाखविले आहे.

रेल्वेमधील शौचालये बायोटॉयलेटयुक्त झाली, वारीला निर्मलवारी बनविण्यासाठी स्वच्छ वारी निर्मल वारी मोहीम, वारकऱ्यांना पाच लाख रेनकोट देऊन त्यांची मोठी सोय केली, अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याची सह्दयता या सरकारने दाखविली, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण, धनगर आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असताना एक हजार कोटींच्या योजना या सरकारने दाखविल्या. या छोट्या बाबी वाटतील, पण यातील काहीही गेली ७० वर्षे काँग्रेस आघाडीला करता आले नाही, असे पाटील म्हणाले.सदस्यता मोहिमेबाबत पाटील म्हणाले की, आजपर्यंत भाजपपासून दूर राहिलेल्या समाज घटकांनाही आपल्याला जोडून घ्यायचे आहे. गरीब, श्रीमंत, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्वजण आपलेच आहेत. संख्यात्मक वाढ करत असतानाच गुणात्मक वाढीवर भर द्यायचा आहे़

बैठकींना उशिरा येणे, अनुपस्थित राहणे, मध्येच उठून जाणे, हे प्रकार आता बंद करावे लागतील. बैठकीला आल्यानंतर फोटो काढत बसायचे, फोटो काढले की हजेरी लावल्याचे सांगायला मोकळे. ते फोटो आधी बंद करा. किती ते फोटो काढतो आपण, असे सांगत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची एकप्रकारे शाळाच घेतली.

टॅग्स :चंद्रकांत पाटीलभाजपा